Pune : ‘ए’ नव्हे ‘अहो रिक्षावाले’ म्हणा – गिरीश बापट 

एमपीसी न्यूज – रिक्षावाल्यांच्या चांगुलपणा, प्रामाणिकपणाचे कौतुक करताना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी रिक्षा चालकांमधील व्यसनाधिनतेविषयी चिंता व्यक्त केली. त्याविषयी संघटनांमार्फत काम करण्याची आवश्कता असल्याचेही ते म्हणाले. रिक्षा चालक आणि माझे नाते 40 वर्षे जुने आहे. पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा पहिली संघटना रिक्षा चालकांची सुरु केल्याची आठवण गिरीष बापट यांनी सांगितले. देश आणि समाज चालविण्यामध्ये मोठ्या पदावर काम करणारी मंडळी जशी महत्वाची आहेत तशीच रिक्षा चालकांसारखी लोकदेखील महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांचा उल्लेख ‘ए’ न करता ‘अहो रिक्षावाले’ असा करावा असे गिरीष बापट म्हणाले.

शिवनेरी प्रतिष्ठान व शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, मानेकर सर, रिक्षा चालकांना मदत करणारे अजय दिक्षित, कराटे प्रशिक्षण देणारे रिक्षा चालक ज्ञानेश्वर सोनवणे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आणि रिक्षा चालकांच्या गुणवंत मुलांचा सत्कार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान,  रिक्षा चालकांचे आणि सामान्य नागरिकांचे एक विशिष्ट नाते असते. रिक्षावाला हा शहरातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख आदरानेच केला पाहिजे. रिक्षावाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र रिक्षा चालक महामंडळ स्थापन केले आहे परंतु, अद्याप त्याचे काम सुरु झाले नाही. राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या वतीने सर्व रिक्षा संघटनांसोबत तत्काळ बैठक लावून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन गिरीश बापट यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.