Mpc News Vigil : मीटरप्रमाणे रिक्षा सुरु करण्यासाठी रिक्षा संघटनाही तयार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक सुरु करण्यास रिक्षा संघटनांचा विरोध नाही. पूर्वी विरळ लोकवस्तीमधील रिक्षा भाड्यांबाबत असलेल्या समस्या वाढत्या शहरीकरणा सोबत सुटल्या आहेत. त्यामुळे आता मीटरप्रमाणे रिक्षा सेवा सुरु करता येईल, असे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले.

बाबा कांबळे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरात आसपासच्या अनेक वस्त्या आणि गावे समाविष्ट झाली. त्यामुळे सुरुवातीला समाविष्ट गाव, वस्त्यांमध्ये रिक्षा चालकांना परतीच्या मार्गावर भाडे मिळत नसे. याचा रिक्षा चालकांना आर्थिक फटका बसत होता. त्यामुळे रिक्षा चालक विरळ लोकवस्तीच्या भागातील प्रवाशांकडून परतीच्या प्रवासाचेही भाडे घेत असत. मात्र, दिवसेंदिवस शहर वाढत असून पूर्वी विरळ लोकवस्ती असलेला भाग देखील दाट लोकवस्तीचा झाला आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना सर्व भागात दोन्ही बाजूने प्रवासी मिळतात.

बाबा कांबळे पुढे म्हणाले, “मीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक सुरु करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी सातत्याने फोनवरून चर्चा होत आहे. तसेच पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्यासोबत बैठक झाली आहे. मीटरप्रमाणे रिक्षा सेवा सुरु करण्यासाठी रिक्षा संघटना आता सकारात्मक आहेत.

रिक्षा दरवाढ बाबत बोलताना बाबा कांबळे म्हणाले, “हकीम कमिटीच्या अहवालानुसार रिक्षाची दरवर्षी भाडेवाढ व्हायला हवी. पीएमपीएमएल, एसटी यांची भाडेवाढ झाली. मात्र मागील पाच वर्षात पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील रिक्षांची भाडेवाढ झालेली नाही. त्याबाबत आम्ही आरटीएकडे प्रस्ताव दिला आहे. त्याबाबत प्रशासन देखील सकारात्मक आहे. त्यावर लवकरच चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.”

दरम्यान, रिक्षा संघटनांकडून रिजनल ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटी (आरटीए) कडे रिक्षाच्या भाडेवाढीबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यावर कोरोनाच्या काळात चर्चा झाली नसून सर्व आस्थापना आणि शासकीय विभाग स्थिरस्थावर झाल्यानंतर रिक्षा संघटनांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांच्या बाबत विचार केला जाणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे आरटीओ अतुल आदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.