Pune News : भाड्यावरून वाद झाल्याने महिलेची पर्स पळवणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

एमपीसी न्यूज : भाड्यावरून वाद झाल्यानंतर महिलेची पर्स घेऊन पळून गेलेल्या रिक्षाचालकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. 21 जून रोजी सायंकाळच्या वेळी हा प्रकार घडला होता. कोंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 35 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली होती. राहुल प्रकाश भोडणे (वय 29) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 21 जून रोजी संबंधित रिक्षातून परिसरात गेली होती. यावेळी तिचा रिक्षाचालका सोबत भाड्याच्या पैशावरून वाद झाला होता. त्यानंतर रिक्षाचालकांनी या महिलेची पर्स हिसकावून पळ काढला होता. गुन्हे शाखेचे पोलिसही या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. रिक्षाचा नंबर वरून पोलिस त्याचा तपास घेत होते परंतु आरोपी आपली राहण्याची आणि कामाचे ठिकाणी बदलून पोलिसांना चकवा देत होता.

तपास सुरू असतानाच पोलीस अंमलदार अमोल पवार आणि इमरान शेख यांना संबंधित रिक्षाचालक टिळेकरनगर परिसरात भाड्याचे घर घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा त्याने लपवून ठेवली होती. ती देखील पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.