Wakad News : भाडे मागितले म्हणून प्रवाशांकडून रिक्षा चालकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षातून प्रवास केल्यानंतर प्रवासाचे पूर्ण पैसे मागितल्यावरून दोघा प्रवाशांनी मिळून रिक्षा चालकाला सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 27) दुपारी रहाटणी फाटा चौकात घडली.

अमित मधुकर वडवे (वय 42, रा. नखाते वस्ती, रहाटणी) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. याबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी नेपाळी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वडवे हे रिक्षा (एम एच 14 / जी सी 0667) चालक आहेत. रहाटणी फाटा येथून दोन अनोळखी नेपाळी व्यक्ती फिर्यादी यांच्या रिक्षातून प्रवास करत होते. रहाटणी फाटा चौकात दोघा आरोपींना दुपारी अडीच वाजता सोडल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे भाड्याचे 20 रुपये मागितले. मात्र आरोपींनी फिर्यादी यांना 10 रुपये दिले.

उरलेले पैसे मागितले असता आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून झटापटी केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सिमेंटच्या गट्टूने डोक्यात मारून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.