Pune : रिक्षा मालक-चालकांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे – मोहन जोशी

एमपीसी न्यूज ; लॉकडाऊनच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने रिक्षा वाहतुकीला बंदी केली. परंतु, या महिनाभराच्या काळात रिक्षा मालक-चालकांचे उत्पन्न बुडाले. सध्या त्यांना आर्थिक समस्या जाणवू लागली. त्यामुळे प्रत्येक रिक्षा मालक-चालकांना सरकारने पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी आणि महाराष्ट्र रिक्षा मालक-चालक महासंघाचे सरचिटणीस नितीन पवार यांनी केली आहे.

या संदर्भात जोशी आणि पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले म्हटले आहे की, महाराष्ट्रात दहा लाख आणि पुण्यात सुमारे एक लाख रिक्षा मालक, चालक आहेत. त्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन रिक्षा व्यवसायाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. लॉकडाऊनचा एक महिन्याचा काळ होऊन गेला. या काळात व्यवसाय बंद असल्याने त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे.

रिक्षा व्यवसाय आणखी अनिश्चित काळपर्यंत बंद ठेवावा लागणार असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे त्यांचे होणारे आर्थिक नुकसान भरुन निघण्यासाठी राज्य सरकारने त्यांना पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे, असे मोहन जोशी आणि नितीन पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

राज्य सरकारने बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य दिले. त्याचप्रमाणे रिक्षा मालक-चालकांच्या मागणीचाही सहानुभूतीने विचार करावा, असेही जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.