Pimpri : हॉर्न वाजवल्यावरून रिक्षा चालकाचे अपहरण
एमपीसी न्यूज – रिक्षा चालकाने रस्त्याने जाताना हॉर्न वाजवला म्हणून गावठी कट्ट्याचा धाक दाखवत एकाने रिक्षा चालकाचे अपहरण केले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी त्याची सुटका केली. ही घटना मंगळवार (दि. 25) रात्री साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथे घडली.
सोमेश्र्वर संगम गिरी (वय 21, रा. कासारवाडी) असे अपहरण आणि सुटका झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मित्र हितेश प्रल्हाद खेदार (वय 21, रा. लांडगेवस्ती, कासारवाडी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मोटारचालक राजेश विष्णू धोत्रे (वय 24, रा. भागवत गिता मंदिराजवळ, खराळवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सोमेश्र्वर हे रिक्षातून त्यांचे मित्र हितेशसोबत जात होते. हितेशला खराळवाडीतील सुदर्शनगर येथे सोडण्यासाठी जात असताना सोमेश्वरने आरोपीच्या स्विफ्ट मोटारीला हॉर्न दिला. हॉर्न दिल्याच्या रागातून राजेशने मोटारीतून उतरून शिव्या देण्यास सुरुवात केली. तसेच गावठी कट्ट्याचा धाक दाखवत त्याला मारहाण केली आणि जबरदस्तीने मोटारीत बसवून नेले. हितेश याने याबाबत तात्काळ पिंपरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी राजेशचा माग काढत कासारवाडी परिसरातून सोमेश्र्वर याची सुटका करून आरोपी राजेशला अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.