pimpri : दिवसाआडच पाणीपुरवठा योग्य, पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अंगलट

महापौरांची कबुली

एमपीसी न्यूज – दिवसाआडच पाणीपुरवठा योग्य होता.  पाणी कपात रद्द केल्याने पाणी कमी आणि मागणी जास्त वाढली आहे. त्यामुळे अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. दररोज पाणी पुरवठ्याचा निर्णय अंगलट आल्याची कबुली महापौर राहुल जाधव यांनी आज (शुक्रवारी) दिली. 

पवना धरणावर मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची भिस्त आहे. गतवर्षी ऑगस्टमध्येच धरण शंभर टक्के भरले. परंतु, पावसाने लवकरच परतीची वाट धरली. अवेळीच नदीऐवजी धरणातून पाणी उचलण्याची वेळ आल्याने महापालिकेने दिवाळीपासूनच अंशतः पाणी कपात केली. यंदा तीव्र स्वरुपाच्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

यंदाही जूनच्या शेवटच्या आठवड्‌यात मॉन्सूनचे आगमन झाले. आठवडा भराच्या तुरळक हजेरीनंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे पाणी कपातीचे संकट गहीरे झाले होते. मात्र, जुलैचा अखेर “मॉन्सून’ने पुन्हा हजेरी लावत “बॅक लॉग’ भरुन काढला. त्यामुळे धरणातून विसर्ग करण्याची वेळ आली. धरण नव्वद टक्के भरताच पिंपरी-चिंचवडकरांची पाणी कपात मागे घेण्याची मागणी होत होती.

मात्र, गतवर्षीचा अनुभव घेता शंभर टक्के धरण भरल्याखेरीज पाणी कपातीबाबतचा निर्णय न घेण्याची भूमिका सुरुवातीच्या काळात महापौर राहुल जाधव यांनी घेतली. त्यावरुन टीकेची झोड उठली होती. अखेर 8 ऑगस्टपासून शहरवासियांना दररोज पाणी पुरवठा करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी पिंपरी-चिंचवडकरांची पाणी कपात रद्द झाली. दररोजच्या पाणी पुरवठ्याच्या नागरिकांच्या आनंदावर पहिल्या दिवसापासूनच विरजण पडले. संपूर्ण शहरातून पाणी टंचाईची ओरड सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.