Pune : रामजन्मभूमी, कृष्णजन्मभूमी, काशी विश्वेश्वर या स्थानांवर हिंदूंचाच अधिकार- सुब्रमण्यम स्वामी

विश्वलीला ट्रस्टतर्फे थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त आर्थिक स्वातंत्र्य- आव्हाने आणि संधी विषयावरील व्याख्यान

एमपीसी न्यूज – भारतवासियांनी सहा दशके मुघलांशी आणि दोन दशके इंग्रजांशी संघर्ष करूनही ८२ टक्के लोकसंख्या हिंदू असल्यामुळे भारत सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुराष्ट्रच आहे. मात्र, हिंदूंचे विभाजन आणि मुस्लिमांचा अनुनय करून काँग्रेसने राज्य केले. रामजन्मभूमी, कृष्णजन्मभूमी आणि काशी विश्वेश्वर या स्थानांवर हिंदूंचाच अधिकार असून रामजन्मभूमीच्या जागेसंदर्भात सुरू असलेला खटला जिंकू, असे राज्यसभा सदस्य अर्थतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले.

विश्वलीला ट्रस्टतर्फे अजिंक्य योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१९ व्या जयंतीनिमित्त राज्यसभा सदस्य अर्थतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांच्या आर्थिक स्वातंत्र्य- आव्हाने आणि संधी या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट येथे करण्यात आले होते. यावेळी पेशव्यांचे वंशज महेंद्र पेशवा, पुष्कर पेशवा, आमदार मेधा कुलकर्णी, आढेगाव येथील श्रीमंत बाजीराव पेशवा सैनिक शाळेचे संस्थापक आबासाहेब कांबळे व वैशाली कांबळे, सीए रणजीत नातू, मेजर जनरल संजय भिडे, विश्वलीला ट्रस्टचे देवव्रत बापट, प्रवीण जोशी, मोतीलाल ओसवालचे अक्षय घळसासी आदी मान्यवर उपस्थित होते.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयामुळे ५० टक्के अल्पसंख्याक समाज सरकारच्या पाठीशी आहे. तसेच ३७० कलम रद्द केल्यामुळे जम्मू आणि काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले आहे. भाजप हिंदूंचे संघटन करत असून तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर अल्पसंख्याक समाजाचे विभाजन होत आहे. तिहेरी तलाक हे धार्मिक स्वातंत्र्य असले तरी तलाकमुळे स्त्री-पुरुष समानता या राज्यघटनेतील तत्त्वाचे उल्लंघन होत आहे.

ते पुढे म्हणाले, आपल्याकडे साधनसंपत्तीची कमतरता नाही. त्यामुळे आपण एखादी गोष्ट विकसित करू शकतो. भारतात अशी एकही समस्या नाही जी आपण सोडवू शकत नाही. फक्त आपण आपल्या देशातील लोकांना एखादी गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. लोकांना नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. प्रत्येक वर्षी १० टक्के प्रगती झाल्यास भारत विकसित देश होईल. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास आपला देश ख-या अर्थाने सक्षम होईल. संयुक्त राष्ट्रांना आव्हान देणारा फक्त आपला भारत देश आहे, असे सांगत स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.