Talegaon : माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण मिळण्याची गृहराज्य मंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले व गैरव्यवहार यांना आळा घालण्यासाठी शासनाने माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कायद्याचे संरक्षण देण्याची गरज आहे. अशी मागणी तळेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनातून केली.

याबाबतचे निवेदन त्यांनी गृहराज्य मंत्र्यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, माहिती अधिकार कार्यकर्ते अनेक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार माहिती अधिकाराच्या माध्यमातून समाजासमोर आणत असतात. हे काम करत असताना त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता हे काम माहिती अधिकार कार्यकर्ते देशसेवा म्हणून करत आहेत. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांना शासनाकडून कायद्याचे संरक्षण मिळायलाच हवे. तळेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची 13 नोव्हेंबर 2010 रोजी अशाच प्रकारच्या रोषातून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आवश्यकतेनुसार पोलिसांचे देखील संरक्षण द्यायला हवे.

पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेत पत्रकारांच्या संरक्षणासाठी विधेयक मंजूर करून त्याद्वारे त्यांना संरक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे माहिती अधिकार कार्यकर्त्यांना देखील शासनाने विधेयक मांडून संरक्षण द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.