Pimpri : उद्यान देखभालीच्या कंत्राटात ‘रिंग’?

फेरनिविदा काढण्याची मारुती भापकर यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने क्षेत्रीय कार्यालय, विविध उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मागविलेल्या निविदेत मोठा गडबळ घोटाळा झाला आहे. निविदा 23 सप्टेंबर 2019 रोजी सादर केल्यावर तब्बल चार महिन्यानंतर निविदा उघडण्याची ‘तत्परता’ महापालिकेने केली आहे. त्यापैकी दोन ठिकाणी रिंग झाली आहे. तर, तीन निविदांमध्ये अपात्र ठेकेदाराला कंत्राट देण्याची घाईगडबड महापालिका प्रशासनाने केल्याचा आरोप करत या निविदा त्वरित रद्द कराव्यात आणि फेरनिविदा काढावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

महापालिकेने उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती, रस्ते, स्वच्छतागृहांच्या साफसफाईच्या 14 कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. दोन वर्षाच्या कामाकरिता या निविदा आहेत. त्यापैकी पाच कोटी 97 लाख रुपयांच्या पाच निविदांमध्ये गडबड घोटाळा झाला आहे. तांत्रिक आणि आर्थिक लिफाफा एकाचदिवशी घाईगडबडीत उघडण्यात आले. त्यामध्ये भोसरी सहल केंद्रातील उद्यानाच्या एक कोटी 85 लाख आणि भोसरी प्राधिकरण पेठ क्रमांक सात येथील एक कोटी 28 लाख या कामात ‘रिंग’ झाल्याचे स्पष्ट दिसून येते.

तर, पिंपळेगुरव येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाच्या 95 लाख 55 हजार, निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान एक कोटी 64 लाख आणि दुर्गादेवी उद्यानातील एक कोटी 50 लाख या कामाच्या अपात्र ठेकेदारांना उद्यान अधिकाक्षकांनी चुकीचे दाखले दिले. चुकीच्या दाखल्याच्या आधारे त्यांना पात्र केले आणि निविदा उघडण्याची घाई केली. तसेच तांत्रिक आणि आर्थिक लिफाफा एकाचवेळी उघडला आहे. तांत्रिक लिफाफा ओपन केल्यानंतर तीन दिवसांनी आर्थिक लिफाफा उघडणे गरजेचे होते. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष करत  तीन दिवसांची मुदत दिली गेली नाही. सूचना, हरकतींना वेळ दिला नाही. दराचे पाकीट उघडताना एकाही ठेकेदारास न बोलविता घाईगडबडीत निविदा उघडण्यात आल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे.

गुरुजी इंन्फास्ट्रक्चर ही संस्था मजूर पुरविण्याचे काम करते. मजूर पुरविणे हे काम उद्यानाच्या निविदेसाठी यापूर्वी कधीही ग्राह्य धरले नाही. परंतु, या निविदेमध्ये संशायस्पदरित्या या ठेकेदारास पात्र करण्यात आले आहे. तसेच अजित स्वयंरोजगार संस्थेला देखील कामाचा अनुभव नसताना चुकीच्या पद्धतीने पात्र केले असून त्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप भापकर यांनी केला. तसेच या दोन्ही संस्थांनी एफडीआर, डीडी स्कॅन जोडले नसल्याने या संस्थांना अपात्र करणे गरजेचे होते. आमदाराच्या भावाने ही कामे नियोजन करुन नातेवाईकांना बसविली आहेत. आमदाराचा भाऊ बसून निविदा भरतो. दुस-या ठेकेदाराला काम मिळू देत नाही, असा आरोपही भापकर यांनी केला.

याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”तांत्रिक आणि आर्थिक लिफाफा एकाच दिवशी उघडला नाही. तांत्रिक निविदा उघडून बरेच दिवस झाले. त्यावर ठेकेदारांचे एकमेकांविरोधात आक्षेप असल्याने तपासणी करण्यात आली. पात्र, अपात्र निश्चित करण्यात जास्त कालावधी गेला. एकाचेवळी तांत्रिक आणि आर्थिक लिफाफा उघडला नाही. त्यामध्ये कालावधी गेला आहे. तांत्रिकनंतर आर्थिक लिफाफा उघडण्यास वेळ गेला. अपात्र करायला पाहिजे होते. त्यांना पात्र केल्याचा आक्षेप आला आहे. ‘ऑडीटर’कडे देऊन त्याची तपासणी केली जाईल. अपात्रला पात्र केले आहे का? हे तपासून पुढील निर्णय घेतला जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.