22.4 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

IPL 2020 : ऋतूराज गायकवाड पुन्हा चमकला, चेन्नईचा पंजाबवर 9 गडी राखून विजय

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – चेन्नईने पंजाबचा नऊ गडी राखून पराभव केला. ऋतूराज गायकवाडने स्पर्धेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावून चेन्नईच्या विजयासह शेवट गोड केला. चेन्नईचा संघ अगोदरच स्पर्धेतून बाहेर गेला आहे. मात्र, या पराभवामुळे पंजाबचं आयपीएल मधील आव्हान संपुष्टात आले आहे.

पंजाबने 20 षटकात 153 धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फाफ डुप्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने संघाला धडाकेबाज सलामी मिळवून दिली. या दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. डुप्लेसिस 34 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा काढून बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने आपली दमदार फलंदाजी करत सलग तिसरं अर्धशतक झळकावलं, 49 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 62 धावा केल्या. त्याला रायडूने (30) चांगली साथ दिली. दोघांनी मिळून चेन्नईला 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला.

त्याआधी धोनीने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. पंजाबची सुरुवात चांगली झाली मात्र, मयंक अग्रवाल 26 धावांवर बाद झाला. पाठोपाठ लोकेश राहुलही 29 धावांवर माघारी परतला. त्यानंतर पंजाबने ठराविक अंतराने गडी गमावले. ख्रिस गेल (12), निकोलस पूरन (2) स्वस्तात तंबूत गेले. मनदीप सिंगही 14 धावा काढून बाद झाला. दीपक हुड्डाने एक बाजू लावून धरत 30 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा केल्या आणि संघाला 153 धावांपर्यंत मजल मारून दिली. चेन्नईकडून लुंगी एन्गीडीने 3 तर शार्दुल ठाकूर, जाडेजा आणि इमरान ताहीरने 1-1 बळी घेतला.

spot_img
Latest news
Related news