SA Tour : दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी ऋतुराज,अय्यरची चर्चा; शिखर धवन साठी आव्हान

एमपीसी न्यूज – जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेसाठी येत्या काही दिवसांत भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. पण, सलामीवीर च्या निवडीवर सध्या निवड समिती चिंतेत आहे. आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणा-या ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. पण, यामुळे शिखर धवन याच्यापुढे या दोघांचे आव्हान निर्माण झाले आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रोहित शर्माची एकदिवसीय कर्णधार म्हणून निवड केली आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी अद्याप संघ जाहीर केलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मासोबत लोकेश राहुल हा सलामीला फलंदाजीला येईल हे निश्‍चित आहे. शिखर धवनने मागील आंतरराष्ट्रीय वन डे मालिकेत कर्णधार व फलंदाज म्हणून मोलाची कामगिरी बजावली असली, तरी सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडकात त्याच्या बॅटमधून धावाच निघत नाहीत.

हजारे करंडक स्पर्धेत ऋतुराजने सलग तीन आणि वेंकटेशने दोन शतके झळकावून लक्ष वेधले आहे.  एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित आणि केएल राहुल सलामी करीत असल्याने ऋतुराजला पर्यायी सलामीवीर किंवा मधल्या फळीत संधी मिळू शकते. ऋतुराजने श्रीलंकेतील दोन T20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे; परंतु एकदिवसीय संघात तो पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.

व्यंकटेश अय्यर मध्य प्रदेशच्या विजयात मोलाची भूमिका बजावतोय. व्यंकटेश अय्यरने चार सामन्यांमधून दोन शतकांसह 348 धावां केल्या आहेत. यामध्ये एक अर्धशतकाचाही समावेश आहे. तसेच गोलंदाजीत त्याने आठ गडी बाद केले आहेत. त्यामुळे हार्दिकच्या जागेसाठी वेंकटेशची निवड निश्चित होऊ शकेल.

भारतीय संघाच्या प्रशिक्षपदी राहुल द्रविड यांची निवड झाल्यानंतर, नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यासाठी इनफॉर्म नसलेल्या अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्माला कसोटी संघात स्थान दिले. त्यामुळे आगामी  दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी धवनलाही संघात स्थान मिळण्याची आशा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.