Pimpri : महाविद्यालयांबाहेर विनाकारण घुटमळणा-या रोडरोमिओंची धरपकड

28 रोडरोमिओ ताब्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या महाविद्यालयांबाहेर विनाकारण घुटमळणा-या रोडरोमिओंची पिंपरी पोलिसांनी धरपकड केली. ज्या तरुणांचा महाविद्यालयात प्रवेश नाही, परंतु तरीही विनाकारण महाविद्यालय परिसर तसेच महाविद्यालयाच्या बाहेर फिरणा-या एकूण 28 तरुणांना ताब्यात घेतले आहे.

पिंपरीमधील प्रतिभा महाविद्यालय मोहननगर, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय संत तुकाराम नगर, जय हिंद कॉलेज पिंपरी, नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी या चार महाविद्यालयांबाहेर ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या तरुणांची तपासणी करून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्या नातेवाईकांसमोर समज देऊन त्यांना सोडण्यात आले. त्यांच्याजवळ आढळून आलेल्या 39 वाहनांची पिंपरी पोलिसांनी यादी तयार करून पिंपरी वाहतूक विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठवली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे म्हणाले, “महाविद्यालयांबाहेर विनाकारण उभा राहून टवाळखोरी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात आली. तसेच महाविद्यालयातील तरुणींशी संवाद साधत शाळा-महाविद्यालयांमध्ये येत-जात असताना अशा टवाळखोर मुलांचा त्रास होतो का? याबाबत चर्चा केली. स्वतःसोबत किंवा मैत्रिणींसोबत काही गैरप्रकार झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून तरुणींना करण्यात आले.”

शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश नसताना देखील विनाकारण शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळखोर तरुणांची गर्दी पाहायला मिळते. विनाकारण वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, स्टंटबाजी करणे यांसारखी व्यसने अशा टवाळखोरांना जडली आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढते आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो म्हणून अशा रोडरोमिओंवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, मधुसूदन घुगे, भरत चपाईतकर आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.