katraj :  जबरी चोरी करीत ट्रकसह फरार झालेले आरोपी अवघ्या तीन तासात जेरबंद

एमपीसी न्यूज – कात्रज सासवड रोडवर एका ट्रक चालकाला जबरदस्तीने खाली उतरून त्याच्याजवळील रोख रक्कम घेऊन ट्रकसह फरार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या तीन तासात जेरबंद केले. या कारवाईत त्यांच्याकडून एकूण 40 लाख रुपये किंमतीचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला. ही घटना आज शनिवारी (दि.11) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.  

निखिल सागर धुमाळ, रवींद्रसिंग, सरदार सिंग, राजावत, दीपक, भरत हिराडे पाटील, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शंकर भीमराव कसबे (वय 24, कंपोस्ट वरवडे, सोलापूर) यांनी तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शंकर कसबे हे आज पहाटे साडेचारच्या सुमारास कात्रज- सासवड रोडवरून ट्रक घेऊन जात होते. यावेळी तीन अज्ञात इसमांनी त्यांची इरटीगा गाडी आडवी लावून शंकर यांना जबरदस्तीने खाली उतरवून शिवीगाळ तसेच मारहाण करून त्यांच्या खिशातील 2 हजार रुपये, मोबाईल काढून घेतला. तसेच त्यांचा ट्रक घेऊन सासवडच्या दिशेने फरार झाले.

कसबे यांनी त्यानंतर तातडीने पहाटे साडेपाचच्या सुमारास याची पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने चोरी केलेल्या ट्रकचा कसोशीने शोध घेऊन आरोपींना अवघ्या तीन तासातच जेरबंद केले. यावेळी त्यांच्याकडील चोरून नेलेला ट्रॅक, रोख रक्कम, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 40 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.  सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.

ही कामगिरी युनिट चारचे पोलीस उप आयुक्त प्रसाद अक्कानुरू, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, सुप्रिया गावडे व पोलीस कर्मचारी लोणकर, धेंडे, गोसावी, चवरकर, चितळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.