Chinchwad News : शहरात आणखी 11 चो-या; चंदनाची झाडे, वाहने, मोबाईल, लॅपटॉप, कंपनीतील साहित्यासह पाच लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरीच्या आणखी 11 घटना उघडकीस आल्या आहेत. तीन मोबाईल हिसकावण्याच्या घटना, दोन घरफोडी, चार वाहन चोरी, कंपनीतील साहित्य चोरीची एक आणि चंदनाची झाडे चोरण्याची एक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 30) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुनावळे, मोशी आणि निगडी येथे रस्त्याने जाणा-या तरुणांच्या हातातून अनोळखी चोरट्यांनी तीन मोबाईल फोन हिसकावून नेले. याबाबत वाकड, एमआयडीसी भोसरी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमआयडीसी भोसरी येथील मेटल इम्परीगनेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या छताचे पत्रे तोडून चोरट्यांनी एक लाख 37 हजार 890 रुपयांचे मटेरियल चोरून नेले. हिंजवडी येथे एका दुकानातून रोख रक्कम आणि सिगारेटची पाकिटे चोरून नेली आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुकानात आलेले कुरियर डिलिव्हरीचे पार्सल देण्यासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने दुकानातून 10 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना मस्केवस्ती रावेत येथे घडली. दापोडी येथील मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातून चार ते पाच जणांनी मिळून दीड लाखांची सुमारे 60 चंदनाची झाडे आणि रोपे चोरून नेली आहेत.

चाकण येथे 45 हजारांची दुचाकी चोरीला गेली. सांगवी परिसरात वाहन चोरीच्या दोन घटना घडल्या. त्यातील एका घटनेत 80 हजारांची रिक्षा तर दुस-या घटनेत 25 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. दिघी येथे 25 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे.

नऊ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या 11 चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी पाच लाख पाच हजार 144 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यातील केवळ दोन गुन्ह्यातील प्रत्येकी एका आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.