Chakan : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव गस्तीवरील पोलिसांनी उधळला; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिसांनी उधळून लावला. ही घटना रविवारी (दि. 11) पहाटे वासुली गावाजवळ शिवम टूल्स अँड ट्यूब कंपनीजवळ घडली. पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

वैभव बापू राऊत (वय 20, रा. चिखली, ता. हवेली. मूळ रा. निजाम जवळा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), अविनाश प्रकाश शिंदे (वय 24, रा. सोनावणे वस्ती, ता. हवेली) यांना अटक केली असून बारक्या उर्फ विकास अजय गायकवाड (रा. महादेव नगर, चिखली), लखन गव्हाणे (रा. सोनावणे वस्ती, चिखली) आणि सागर भालेराव (रा. देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळ निघोजे गावच्या हद्दीत जामदार वस्तीवर एच पी पेट्रोल पंप आहे. या पंपावर वरील आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. सर्व आरोपी वासुली गावाजवळ शिवम टूल्स अँड ट्यूब कंपनीजवळ एका कार (एम एच 14 / सी जी 5772) मध्ये थांबले होते. चाकण पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पथकाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी कारमधील तरुणांकडे विचारणा केली. त्यावेळी त्यातील तीन जण पळून गेले. तर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते सर्वजण पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे कबूल केले.

आरोपींकडून दोन लाख रुपये किमतीची एक कार, एक हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, पाच हजार रुपये किमतीचा एक मोबाईल, लोखंडी कोयता, लोखंडी सुरा, लोखंडी रॉड, एक एटीएम कार्ड, दोन पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट, तीन दारूच्या बाटल्या, एक मास्क असा एकूण 2 लाख 8 हजार 450 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.