Chakan : भरदिवसा घरफोडी करून पाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून पाच लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे असा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी नऊ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.

शशिकांत शिवाजी तेलगे (वय 27, रा. राणूबाईमळा, नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर गेले. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. दिवसभरात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून 23 तोळे सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे असा एकूण पाच लाख चार हजारांचा ऐवज चोरून नेला. शशिकांत सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.