Ravet : फ्लॅटचे लाॅक तोडून 85 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – फ्लॅटचे लोक तोडून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी पहाटे दोन ते साडेतीनच्या सुमारास शिंदे वस्ती रावेत येथे  घडली. 

केनाराम रामाजी चौधरी (वय 39, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 7) पहाटे दोन ते साडेतीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केनाराम यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून सव्वा तोळे वजनाची पंचवीस हजार रुपये किमतीची एक सोन्याची साखळी, चाळीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व कानातले आणि वीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 85 हजारांचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान, हा सर्व प्रकार सोसायटीच्या जिन्यामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अज्ञात चोरटे हातामध्ये तलवारी घेऊन आले असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. जिन्यामध्ये सीसीटीव्ही असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तलवारीने सीसीटीव्हीचे कनेक्शन कापले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.