Akurdi : …’पुण्याचे पाहुणे’ म्हणून त्यांनी अपरात्री काढले कुटुंबाला गावाबाहेर!

कोरोनाच्या दहशतीमुळे 'अतिथी देवो भव'ला तिलांजली

एमपीसी न्यूज (स्मिता जोशी) – काही अत्यंत महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांना कोकणातील एका गावी जावे लागले पण ‘पुण्याचे पाहुणे’ गावात आल्याचे कळताच रात्री उशिरा गावकऱ्यांनी त्यांना गाव सोडून जाण्यास भाग पाडले. पुढे रोह्यात देखील त्यांना थांबणे अशक्य झाले, शेवटी ‘संचारबंदी’ असतानाही जोखीम पत्करून ते कुंटुंब कसेबसे पिंपरी-चिंचवडमध्ये सुखरूप परतले. ‘एमपीसी न्यूज’च्या सहायक संपादक स्मिता जोशी यांना हा कटू अनुभव आला. वाचूयात त्यांच्याच शब्दांत…

सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मला स्वत:ला आलेला हा अनुभव खास ‘एमपीसी न्यूज’च्या वाचकांबरोबर शेअर करतेय. यात कोण चूक किंवा कोण बरोबर हा मुद्दा नसून माणुसकी जेव्हा पणाला लागते तेव्हा काय काय सहन करावे लागते हा मुद्दा आहे. थोडा मोठा असला तरी नक्की वाचा.

काही महत्त्वाच्या कामानिमित्त मला माझ्या बहिणीकडे रायगड जिल्ह्यातील रोहा या औद्योगिक क्षेत्राशेजारील घोसाळगड या छोट्याशा गावी जावे लागले. दोन दिवस तिथे राहून मंगळवारी परत येण्याचा आमचा विचार होता. करोनाच्या दहशतीमुळे शहरातील व्यवहार बंद होते.  त्यातच रविवारी संपूर्ण देशभर ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यामुळे  शनिवारी सायंकाळी घोसाळ्याला जायला आम्ही दोघे मुलीसह आमच्या गाडीतून निघालो.  पुढे काय वाढून ठेवलंय याची त्यावेळी तरी कोणालाच कल्पना नव्हती. ना आम्हाला, ना माझ्या बहिणीला, ना इतर कोणाला!

रात्री आम्ही तिथे पोचलो. घोसाळगड येथे शिवकालीन किल्ला आहे. आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याशी वस्ती आहे. गावात साधारणपणे शंभर एक घरे असतील. कोकणातलं टिपिकल गाव. एरवी तिथे राहणं आम्हाला खूप आनंददायी वाटतं. कारण शहराच्या गोंगाटापासून दूर निवांत क्षण अनुभवता येतात. तसंच रविवारचा दिवस मजेत गेला. सोमवारचा दिवस देखील मजेत गेला. दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मार्चपर्यंत संचारबंदीची घोषणा केली. आणि त्यानंतर घरी कसं परत येता येईल, याचा विचार मनात आला. बहीण म्हणाली, तू इथे कुठे जंगलात आहेस. कामाच्या व्यापामुळे एरवी तुम्हाला राहता येत नाही तर 31 तारखेपर्यंत मजेत राहा की. दुसरे कोणतेच पर्याय उपलब्ध नसल्याने अखेरीस तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. अगदी 31 तारखेपर्यंत नाही पण कमीत कमी पाच-सहा दिवस तरी राहूया असं ठरलं. संध्याकाळ देखील त्याच मूडमध्ये गेली. रात्रीची जेवणे झाली. अचानक गावात मोठमोठ्याने भांडणाचा आवाज येऊ लागला.

कानोसा घेतल्यावर कळलं की शेजारच्या घरात मुंबईहून काही तरुण पाहुणे आल्याचे गाववाल्यांना कळले होते. आणि ते तरुण हुल्लडबाजी करत होते. त्यामुळे गावक-यांनी त्यांना निघून जायला सांगितले. गावकरी एकत्र झाले होते. मात्र ज्यांच्याकडे ते आले होते, ती व्यक्ती त्यांना परत पाठवायला तयार नव्हती. वादावादीत त्या माणसाने सांगितले की, शेजारच्या घरीदेखील पुण्याहून पाहुणे आले आहेत. त्यांना पण परत जायला सांगा, तर मी माझ्या पाहुण्यांना परत पाठवेन. त्यावर गावकरी म्हणाले की, तिथे पाहुणे आल्याचे आम्हाला कळले देखील नाही, इतकी शांतता आहे. पण तुमच्या घरी उगाचच गोंगाट सुरु आहे. मात्र तो माणूस त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. त्यामुळे अखेरीस रात्री अकरा वाजता गावकरी बहिणीच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला रात्रीच्या रात्री गावातून निघून जायला सांगितले.

रात्रीच्या वेळी आम्ही तिघे कुठे जाणार याचा विचार देखील त्यांच्या मनात आला नाही किंवा ते त्या माणसाला ठामपणे असे म्हणू शकले नाहीत की ते पाहुणे आम्हाला काहीही त्रास देत नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांना जायला सांगणार नाही किंवा गावकरी आम्हाला सकाळी जा, असं देखील म्हणू शकले असते पण ते तसं देखील म्हणाले नाहीत. नाईलाजाने ‘नेसत्या वस्त्रानिशी’ असं ज्याला आपण म्हणतो तसं आम्ही गावातून बाहेर पडलो. जवळच रोह्यात बहिणीचा रिकामा फ्लॅट होता आणि भाऊदेखील तिथेच शेजारी राहतो. त्यामुळे आम्ही रोह्याला जायला निघालो. जाताना योगायोगाने गाडीतल्या टेपवर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अजरामर गीत लागले होते. उपेंद्र आणि मी सहेतुकपणे एकमेंकांकडे पाहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सहन केलेल्या हालअपेष्टांपुढे आपल्या पुढचे हे संकट म्हणजे ‘किस झाड की पत्ती’ असं बोलून देखील दाखवलं. स्वत:ला सावरकरांच्या जागी ठेवण्याचा विचार देखील आमच्या मनात नव्हता. मात्र आपल्या घराची महती काय असते, याची जाणीव मात्र नक्की झाली.

रात्रीच्या सुनसानवेळी त्या जंगलातून जाताना अनेक विचार मनात रुंजी घालत होते. गावक-यांचा राग येत होता. मतलबासाठी माणूस एवढी माणुसकी कशी काय विसरु शकतो याचा विचार येत होता. सकाळी जा असे सांगितले असते तरी आम्ही नक्की गेलो असतो पण एवढ्या रात्री?…

रात्री बारा वाजता आम्ही रोह्यात पोचलो. चुपचापपणे घरात शिरलो आणि झोपण्याचा प्रयत्न करु लागलो, ती येतच नव्हती. सकाळी शेजारी राहणा-या भावाकडे गेलो. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो त्याच्या कंपनीत जाण्याच्या घाईत होता. तो केमिकल कंपनीत काम करतो. त्यांना कंपनी बंद ठेवता येत नव्हती. वहिनीने दिलेला चहा, नाश्ता घेतला. बातम्या बघू लागले. एवढ्यात भावाचा कंपनीतून फोन आला. रोह्यात देखील आजूबाजूला नवीन कोण आले आहे याची पोलीस चौकशी करत होते. त्यामुळे आम्ही लगेच बहिणीच्या फ्लॅटवर गेलो. अर्थातच तो वापरता फ्लॅट नव्हता. त्यामुळे तेथे फक्त जीवनावश्यक सोयी होत्या. बाकी काहीच नव्हते. अशा परिस्थितीत आता इथे 31 तारखेपर्यंत वेळ कसा काढायचा याचा आम्हाला दोघांना प्रश्नच पडला. मग तेथून निघून परत घरी येण्याचा विचार मनात घोळू लागला. हे जमवायचे कसे हा यक्षप्रश्न होता. पण निघायला तर हवेच होते. कारण आपल्यामुळे नातेवाईकांना किती धोक्यात घालायचे याची मनात भीती होती.

अखेरीस विचार करुन करुन तेथून निघण्याचे नक्की केले. काय होईल ते होऊ दे, आता इथून बाहेर पडायलाच हवे हे नक्की झाले. मग ओळखीतल्या लोकांना फोनाफोनी केली. आमचे लोणावळ्याचे पत्रकार सहकारी विशाल विकारी यांना फोन करुन द्रुतगती महामार्गाची हालहवाल जाणून घेतली. जिल्ह्याच्या सीमा सील केल्याने पहिल्यांदा पोलिसांशी गाठ पडेल ती महामार्गावर याची जाणीव होती. विशाल म्हणाले की, महामार्गावर जरुरी वाहतूक सुरु आहे. तुम्ही गाडीत किती माणसं आहात, तीन म्हटल्यावर ते म्हणाले, फक्त पोलीस विचारतील त्याची योग्य ती उत्तरे द्या. अखेरीस सुटकेचा मार्ग दिसल्यामुळे पल्लवीत झालेल्या आशा मनात घेऊन आम्ही तिघे गाडीत बसलो. रोह्यातून बाहेर पडताना सर्वत्र शुकशुकाट होता. पोलीस  कुठेच नव्हते. सुटकेचा नि:श्वास टाकला. पुढे पालीजवळील वाकण फाट्यावर पोलीस असतील अशी भीती होतीच. पण तिथे देखील सुखरुप सुटका झाली. मजल दरमजल करत अखेरीस खालापूर टोलनाक्यावर पोचलो. वाटेतील छोट्या वाड्यावस्त्यांवर एक वेगळेच चित्र होते. गावात शिरणारा रस्ता दगड, काटे, बांबू टाकून बंद केलेला होता. प्रत्येक ठिकाणी मनाला वेदना देणारे हेच चित्र होते.

टोलनाक्यावर पोलीस होते, पण चौकशी झाली नाही. गाडीत कुटुंब दिसल्याने त्यांना काही विचित्र वाटले नसणार. अक्षरशः सुटकेचा नि:श्वास टाकला. संपूर्ण द्रुतगती महामर्गावर शुकशुकाट होता. तुरळक वाहनांची ये जा सुरु होती. गर्दीच नसल्याने आम्ही महामार्ग पार करुन किवळे येथे मुकाई चौकात आलो. तिथे मात्र पोलिसांचा फौजफाट तैनात होता. येणा-या जाणा-याची कसून चौकशी केली जात होती. आमची देखील गाडी थांबवण्यात आली.

‘कुठून आलात’? ड्युटीवरील पोलिसाकडून पहिला प्रश्न आला.

‘रायगड, रोहा’,  असे आमचे उत्तर.

‘तिथल्या पोलिसांनी कसे काय सोडले’? अर्थातच आमच्याकडे काहीच उत्तर नव्हते. कारण तिथे अडवण्यातच आले नव्हते. तेच सांगितले.

‘राहता कुठे’ ? ‘आकुर्डी’

आता मात्र पोलिसांना सांगितले की तिथल्या गावकऱ्यांनी आम्हाला गावातून हाकलले, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला निघावे लागले. मग उपेन्द्रने त्यांना त्याचे कार्ड दाखवले. साहेब मी स्वत: दंतवैद्यक आहे. एक जबाबदार नागरिक आहे. अत्यंत नाईलाज झाला म्हणूनच बाहेर पडलो असे काकुळतीने सांगितले. ते मात्र त्यांना मनोमन पटले आणि आम्हाला जाण्याचा इशारा करण्यात आला. परत एकदा सुटकेचा मोठ्ठा नि:श्वास!

पुढे भोंडवे चौकात देखील बंदोबस्त होता. इथे तर रस्ता बंदच केला होता. गाडीला थांबायला सांगितले. येणाऱ्या जाणाऱ्यांची तीच चौकशी. पाच मिनिटांनी आमच्या गाडीकडे एका पोलिस शिपायाने मोहरा वळवला. पुन्हा तीच प्रश्न-उत्तरे. गावकऱ्यांनी हाकलले म्हटल्यावर त्याला आपले हसू आवरेना. त्याच्याकडून जाण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला. तिथे असलेल्या साहेबांनी त्याला कारण विचारल्यावर त्याने हसत हसतच गावक-यांनी हाकलले म्हणून सांगितले. अखेरीस एकदाची आमची गाडी सोसायटीच्या गेटमधून हातावर सॅनिटायझर घेऊन आता शिरली. आणि घर गाठल्याचा आनंद गगनात मावेना म्हणजे काय याचा अनुभव आला. ‘गड्या आपला गाव बरा’ असे का म्हणतात त्याचा प्रत्यय आला. लगेचच सगळ्यांना फोन केले. कारण तिकडे रोह्यात भाऊ, बहीण देखील टेन्शनमध्येच होते.

घरी पाऊल टाकताना कोणत्या दिव्यातून आपण गेलो याची मनोमन जाणीव झाली. सगळं आवरुन टीव्ही बघायला बसलो, तर रात्री आठ वाजता पंतप्रधान परत एकदा संवाद साधणार आहेत, अशी बातमी आली. उत्सुकतेने टीव्हीसमोर बसले. पंतप्रधानांनी घोषणा केली की रात्रीपासून पुढील २१ दिवस संपूर्ण लॉकडाऊन. आमच्या घरात एक मोठ्ठा सन्नाटा. दोन मिनिटांनी भानावर आल्यावर आम्ही दोघांनीही एकमेकांकडे बघितले. त्या नजरेत मागील चोवीस तासात घडलेल्या सगळ्या घटनांचा क्रम दिसत होता.

विचार करताना यात कोण बरोबर कोण चूक हे कळतच नव्हते. काहीही असो, आम्ही मात्र एका दिव्यातून सहीसलामत बाहेर आलो याची खूणगाठ मनाशी बांधली. कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याचा मला काहीच हक्क नाही पण  याचवेळी रात्रीच्या वेळी गावातून हाकलणाऱ्या गावकऱ्यांबरोबर मदतीचा हात देणाऱ्या पोलिसांची देखील माणुसकी दिसली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.