Ronit Roy: पहिल्या ‘सिल्व्हर ज्युबिली’ चित्रपटानंतरही जेवायला पैसे नव्हते; रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा

Ronit Roy: There was no money to eat even after the first 'Silver Jubilee' movie; Ronit Roy's shocking revelation

एमपीसी न्यूज – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता रोनित रॉयने 1992 मध्ये ‘जान तेरे नाम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा हा पहिलाच चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. पण तरीदेखील त्यानंतर पुढचे चार वर्षे तो बेरोजगार होता. जेवायलाही पैसे नव्हते, अशी अवस्था होती. पण या परिस्थितीतही मी आत्महत्या करण्याचा कधीच विचार केला नाही, असा मन हेलावून टाकणारा खुलासा रोनित रॉयने केला.

सध्या अत्यंत यशस्वी असा टीव्ही स्टार असलेल्या रोनितने एका मुलाखतीत सांगितले की, “माझा पहिलाच चित्रपट त्या काळी 25 आठवडे चालला होता. म्हणजे आताचा 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवणारा चित्रपट समजा. पदार्पणातच मला एवढं यश मिळालं होतं. पण त्यानंतर सहा महिने मला कामासाठी एकही कॉल आला नाही. त्या पुढची तीन वर्षे मी लहान-सहान काहीतरी काम करत होतो आणि 1996 पर्यंत सर्वच काम हातून निघून गेलं होतं. त्यामुळे ती चार वर्षे मी घरीच होतो.

माझ्याकडे छोटी गाडी होती पण त्यात पेट्रोल टाकायला पैसे नव्हते. सिल्वर ज्युबिली चित्रपटानंतरही माझ्याकडे जेवायला पैसे नव्हते. पण इतका कठीण काळ आला तरी मी कधीही आत्महत्येचा विचारदेखील केला नाही. मी कोणावर टीका करत नाहीये. पण प्रत्येकजणाला आयुष्यात कधी ना कधी आर्थिक समस्यांना सामोरं जावेच लागते. पण अशा वेळी आत्महत्या हा काही पर्याय नसतो.”

सध्या लॉकडाउनमुळे शूटिंग बंद झाल्याने सर्व कलाकार व पडद्यामागे काम करणारे कर्मचारी घरी बसले आहेत. या काळात नैराश्याने, आर्थिक समस्या असल्याने काही कलाकारांनी आत्महत्या केली. 17 मे रोजी अभिनेता मनमीत ग्रेवालने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर 26 मे रोजी ‘क्राइम पेट्रोल’मध्ये काम केलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहताने आत्महत्या केली. ती 25 वर्षांची होती. त्यानंतर रोनितने ही आपबीती शेअर केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.