LSG vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने रोखले लखनऊ संघाचे विजयी अभियान

14 धावांनी नमवत मिळवला  महत्वपूर्ण विजय

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : लखनऊ संघाने आपल्या पदार्पणातल्या आयपीएल मध्ये  प्रभावी कामगिरी केली होती. आजच्या महत्वपूर्ण सामन्यात मात्र त्यांना तशीच कामगिरी करण्यात नेमके ब अपयश आले आणि रजत पाटीदारच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगलोर संघाने दिलेले 208 धावांचे आव्हान पार कऱण्यात त्यांना 14  धावां कमी पडल्या. ज्यामुळे त्यांचा टाटा आयपीएल 2022 मधला संस्मरणीय प्रवास आजच समाप्त झाला आहे आणि के एल राहूलच्या संघाची मोठी निराशा झाली आहे.

आरसीबी साठी  हा विजय नक्कीच स्फूर्तीदायक आहे. त्यांना अंतीम फेरीत प्रवेश करण्यासाठी आता 27 तारखेला राजस्थान रॉयल्सला नमवावे लागेल. जबरदस्त खेळी करणारा रजत पाटीदार सामन्याचा मानकरी ठरला.

लखनऊ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन आपल्या पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी लढणाऱ्या संघातला एलिमिनेटरचा सामना आज कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला गेला. ज्यात लखनऊ संघाचा कर्णधार के एल राहूलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत डूप्लेसीच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. (पावसामुळे मैदान थोडे ओले झाले असल्याने सामना अर्धा तास उशिरा सुरु झाला,पण नंतर मात्र पावसाने सुट्टी घेत स्वतःसह सर्वानाच सामन्याचा आनंद घेऊ दिला).

रॉयल चॅलेंजर्सची सुरुवात आज अतिशय खराब झाली. कर्णधार डूप्लेसी आजच्या महत्वाच्या सामन्यात संघासाठी विशेष काहीही योगदान न देता अतिशय स्वस्तात मोहसिन खानच्या डावातल्या आणि वैयक्तिक पहिल्याच षटकात बाद होवून तंबूत परतला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. मात्र या धक्क्याने जराही विचलित न होता कोहली आणि रजत  पाटीदार या जोडीने जबरदस्त आणि झुंजार खेळ करत दुसऱ्या गड्यासाठी 52 चेंडूत 66 धावांची चांगली भागीदारी करुन डूप्लेसीच्या बाद होण्याने आलेले दडपण बर्यापैकी कमी करण्यात यश मिळवले.

कोहलीला चांगली लय सापडली आहे असे वाटत असतानाच तो 25 धावा करुन आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 24 चेंडूत 2 चौकार मारत या धावा करताना रजत पाटीदारला चांगली साथ दिली. त्याच्या जागी आलेल्या आक्रमक मॅक्सवेलला आज फारसे वेल करता आले नाही आणि तो केवळ 9 धावा करुन क्रुनाल पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि आरसीबीची अवस्था 10.3 षटकात 3 बाद 86 अशी झाली.

यानंतर महिपाल लोमरारने पाटीदारला थोडीफार साथ देत डाव पुढे चालू ठेवला. पण लोमरारही 14 धावा करुन रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि लखनऊ संघही गुजरात सारखेच आपल्या पदार्पणातली स्पर्धा गाजवणार असे वाटायला लागले होते. मात्र रजत पाटीदारने एक अविस्मरणीय खेळी करताना आपल्या संघाला अडचणीतून एकदम मजबूत परिस्थितीत आणून ठेवतबआपले पहिलेवहिले शतक तेही संघ अडचणीत असताना पूर्ण करुन एक शानदार खेळी केली.

त्याला दिनेश कार्तिकने योग्य साथ देताना जास्तीत जास्त खेळायची संधी दिली. ज्यामुळेच रजतआपले पहिले शतक करू शकला.त्याने फक्त 49 चेंडूत हे शतक पूर्ण केले जे या हंगामातले सर्वात वेगवान शतक ठरले. ज्यात 11 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार सामील होते.या जोडीने अखेरपर्यंत नाबाद राहत 5 व्या गड्यासाठी 43 चेंडूत 92धावांची मोठी भागीदारी करुन संघाला 207 धावांची मोठी आणि आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली, कार्तिकने   23 चेंडूत 5 चौकार आणि एक षटकार मारत नाबाद 37 धावा केल्या तर रजत 112 धावा काढून नाबाद राहिला.

लखनऊ सुपर जायंट्सने या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करत प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवून सर्वानाच प्रभावित करताना आपले आयपीएल पदार्पण संस्मरणीय केले होतेच,त्या कामगिरीला आता आणखीन चकचकीत कोंदण करण्यासाठी आणि विजेतेपदाकडे आणखी एक पाऊल टाकण्यासाठी त्यांना 120 चेंडूत 208 धावा हव्या होत्या. त्यासाठी त्यांना हवी होती मजबुत सुरुवात. पण तीच करण्यात त्यांना अपयश आले.

डीकॉक आज मात्र  विशेष काही करु शकला नाही आणि केवळ 6 धावा करुन सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि लखनऊला पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर मनन वोरा, राहुलला साथ देण्यासाठी आला, मात्र त्यालाही या महत्वाच्या सामन्यात संघाला विशेष योगदान देता आले नाही. तो वेगवान 19 चेंडू धावा काढून  हेजलवूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि लखनऊची अवस्था 5 व्या षटकातच 2 बाद 41 अशी झाली.

यानंतर राहूलला साथ देण्यासाठी आला तो लखनऊ संघाचा तारणहार दिपक हुडा,त्याने राहुलसोबत पुढे लढाई चालू ठेवताना बघताबघता तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी करुन संघाला विजयाच्या दिशेने पुढे घेवून जाण्यात लक्षणीय कामगिरी बजावली. दरम्यान कर्णधार राहुलने आपल्या चांगल्या फॉर्मचा अचूक फायदा उठवत आणखी एक अर्धशतक पूर्ण केले. त्याने षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे त्याचे 30 वे आयपीएल अर्धशतक होते. त्याला हुडा  ही चांगली साथ देत होता.

शेवटच्या सहा षटकात लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 80 धावा हव्या होत्या आणि त्यांचे 8 गडी शाबूत होते. यावेळी लखनऊला विजयाची जास्त संधी आहे असे वाटत असताना हसरंगाने एका गुगलीवर दिपक हुडाला 45 धावांवर त्रिफळाबाद करून आपला या हंगामातला 25 वा बळी मिळवून संघाला मोठे यशही मिळवून दिले. हुडाने  25 चेंडूत  1 चौकार आणि 4 षटकार मारत या धावा केल्या. तो बाद झाला अन त्याच्या जागी आला तो मार्कस स्टोयनिस. या जोडीवरच लखनऊ संघाच्या सर्व आशा केंद्रीत होत्या.

अखेरच्या 24 चेंडूत लखनऊला विजयासाठी 55 धावा हव्या होत्या तर आरसीबीला 7 विकेट्स अथवा या धावा रोखण्याची गरज होती. सामना रोमांचक होणार असे खात्रीपूर्वक वाटायला लागले होते. मात्र हर्षल पटेलने 17 वे षटक अतिशय जबरदस्त टाकत खतरनाक स्टोयनिसला पाटीदारच्या हातून झेलबाद करुन आरसीबीला विजयाची जास्त संधी मिळवून दिली. पुढील 12 चेंडूत लखनऊला 32 धावांची गरज होती. आणि त्यातले एक षटक होते अनुभवी हेजलवूडचे. या षटकात 3 वाईड चेंडू टाकल्यानंतर पुढच्या चेंडूवर के एल राहूलला 79 धावावर शाहबाजच्या हातून झेलबाद करुन एकच सनसनाटी उडवून दिली.

जम बसलेल्या राहुलला त्याने बाद करताच आरसीबीच्या गोटात एकच हर्षोल्हास झाला. राहुलने 58 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकात मारत 79 धावा केल्या, पुढच्याच चेंडूवर त्याने कृनाल पंड्याचा आपल्याच हातात झेल घेत लखनऊला आणखी एक मोठा झटका दिला आणि आता विजय आरसीबीच्या एकदम हातातोंडाशी आणून दिला. अखेरच्या सहा चेंडूत 24 धावा हव्या होत्या आणि त्या रोखण्याची जबाबदारी होती हर्षल पटेलव. त्याने ती जबाबदारी चौख पार पाडत आपल्या संघाला 14 धावांनी विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
4 बाद 207
कोहली 25,लोमरार 14,मॅक्सवेल 9 ,कार्तिक नाबाद 37 रजत पाटीदार  नाबाद 112
मोहसीन 25/1,कृनाल पंड्या 39/1,बिष्णोई 45/1
विजयी विरुद्ध

लखनऊ सुपर जायंट्स
6 बाद 193
राहुल 79,डीकॉक 6,हुडा 45,मनन वोरा 19
सिराज 39/1,हेजलवूड 43/3,हसरंगा 42/1,पटेल 25/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.