Pune : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’च्या ‘रोझा ईफ्तार’ मध्ये सर्वधर्मीय सलोख्याचे दर्शन

एमपीसी न्यूज- ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ (गांधीभवन ) तर्फे सोमवार, 20 मे रोजी सायंकाळी सात वाजता ‘रोझा ईफ्तार ‘चे आयोजन करण्यात आले होते. सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होऊन सलोख्याचे दर्शन घडवले.

या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोथरुडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, ‘लिज्जत पापड ‘ संस्थेचे कार्यकारी संचालक सुरेश कोते, मौलाना इसहाक शेख उपस्थित होते. ‘गांधी स्मारक निधी ‘चे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. ‘गांधी स्मारक निधी’ चे सचिव अन्वर राजन यांनी स्वागत केले.

मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु असून उपवास सोडण्यासाठी ‘रोझा इफ्तार ‘चे आयोजन केले जाते . सर्व धर्मियांचे धार्मिक प्रसंग एकत्र साजरे करून सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘तर्फे सर्वधर्मीय नागरिक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम आयोजित केल्याचे डॉ.कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.’देशाला सर्व धर्म एकत्र सलोख्याने राहण्याची आवश्यकता आहे . गांधींच्या विचाराने शांतता आणि एकात्मता पुढे गेली पाहिजे . द्वेष , दंग्यांपेक्षा प्रेम आणि सलोखा समाजासाठी महत्वाचा ठरेल ‘,असेही डॉ . सप्तर्षी म्हणाले .

सुरेश कोते ,प्रतिभा जोशी ,मौलाना इसहाक शेख यांनीही मनोगत व्यक्त केले . सुरेश कोते म्हणाले ,’जाणीवपूर्वक अन्य धर्मियांबद्दल चुकीचा प्रचार केला जातो . चांगल्या -वाईट व्यक्तींचे प्रमाण सर्वत्र सारखे असते ,मात्र ,तरीही त्याचे खापर संपूर्ण धर्मावर फोडण्याचे कारस्थान केले जाते . त्यामुळे देशाचे नुकसान होते ‘

या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे . पुणे ,कोथरूड ,वारजे परिसरातील मुस्लिम बांधव ,मशिदीचे पदाधिकारी निमंत्रित करण्यात आले होते. गांधीभवन (कोथरूड ) येथे हा कार्यक्रम झाला . इफ्तार नंतर नमाज पठण करण्यात आले.

प्रशांत कोठडिया,नगरसेविका लक्ष्मी दुधाणे ,इस्माईल शेख,मुख्तार मणियार, संदीप बर्वे,नुरुभाई पटेल, प्रवीण सप्तर्षी,जमील सय्यद, बाबा खान, माणिक दुधाणे,अभिजीत मंगल,हमीद शेख, इलीयास खान, आसिफ मिस्त्री, इक्बाल हवालदार, फिरोज मुल्ला, अॅड . संतोष म्हस्के , फिरोज मुल्ला, क्रांती माने, आनंद तांबे, दुर्गा शुक्रे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.