Pune : आरपीआय’ कॅन्टोन्मेंटची जागा घेणारच

एमपीसी न्यूज – “जिल्ह्यातील २१ मतदारसंघांपैकी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) उमेदवाराला कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ दिला जावा, असा आग्रह स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केला असून, ही जागा ‘आरपीआय’ला मिळायलाच हवी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मतदारसंघात पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामे झालेली आणि सुरु आहेत. तसेच या भागात पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आमच्या हक्काचा आहे, तो आमच्या उमेदवाराला मिळायला हवा, अशी मागणी शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

शहरातील पक्षाचे प्रमुख नेते रामदास आठवले यांच्यासह दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून ही जागा आरपीआयला देण्यात यावी, अशी मागणी करणार आहेत. पक्षाकडे बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, निलेश आल्हाट, हिमाली कांबळे, महेश कुर्णे, संजय सोनावणे, पी. टी. गायकवाड यांनी रीतसर उमेदवारी मागितली आहे. कॅन्टोन्मेंटची जागा मिळाल्यावर सर्व उमेदवारांचे एकमत करून सर्व संमतीने एक उमेदवार दिला जाईल. अन्यथा रामदास आठवले ज्यांची निवड करतील त्याला निवडून आणले जाईल. इच्छुक उमेदवारांची यादी पुणे शहर कार्यालयाकडून रामदास आठवले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

अशोक शिरोळे, सरचिटणीस बाबुराव घाडगे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष वसंतराव बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, सरचिटणीस महिपाल वाघमारे यांनी उमेदवाराच्या मागणीसाठी आग्रह केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.