Pimpri News : आरटीईची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु; 21 मार्चपर्यंत भरता येणार अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आज (बुधवार) पासून सुरु झाली आहे. 21 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी  मदत केंद्र करण्यात आली आहे. या 10 मदत केंद्रांवर पालकांना सहाय्य मिळणार आहे.

मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठीचे 25 टक्के आरक्षण जागांसाठी ऑनलाईन शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावर्षी 179 शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. तर, आरटीईसाठी यंदा 3323 जागा उपलब्ध आहेत. आरटीई प्रवेशासाठी पिंपरी -चिंचवड शहरातील 186  शाळांची नोंदणी करण्यात आली होती.

आरटीई अर्ज भरणा-या पालकांना अनेक तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच काही पालकांना शिक्षणाअभावी अर्ज भरणे शक्य होत नाही. या सर्व समस्या सोडवण्याकरता महापालिकेच्या वतीने पालकांसाठी ही मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.  आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी 3 मार्च ते 21 मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या मदत केंद्रांवर पालकांना सर्व मार्गदर्शन करण्यात येईल. या मदत केंद्रांशी संपर्क साधून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आरटीईसाठी शहरातील मदत केंद्र  
फकिरभाई पानसरे प्राथमिक उर्दु शाळा, आकुर्डी  , कल्पना इंग्लिश मिडीयम स्कूल,निगडी, एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी, जी.एस.के. इंग्लिश मिडीयम स्कूल, जाधववाडी, सिद्धेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूूल, भोसरी, किडस इंग्लिश मिडीयम स्कूल, च-होली, इन्फंट जिजस प्रायमरी स्कूल, कासारवाडी, एम . एम. स्कूल ,काळेवाडी, एस.पी. स्कूल, वाकड आणि किलबिल स्कूल, पिंपळेगुरव या दहा ठिकाणी महापालिकेने मदत केंद्र सुरु केली आहेत. येथे पालकांना मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.