pimpri : ‘आरटीआय’ कायदा बळकट केला, विरोधक नाहक राजकारण करतात – खासदार साबळे 

एमपीसी न्यूज – संसदेत माहिती अधिकार कायदा बळकट केला आहे. सर्वसामान्यांना मिळणा-या माहितीच्या अधिकारात कोणतीही गदा आणली नाही. परंतु, विरोधक नाहक संसदेने घेतलेल्या निर्णयाला ‘कलंक’ लावत आहेत, असा आरोप भाजप खासदार अमर साबळे यांनी केला. तसेच केवळ माहिती आयुक्त, मुख्य आयुक्तांचे वेतन आणि कालावधी ठरविण्याची सुधारण केली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पावसाळी अधिवेशनात संसदेत झालेल्या कामकाजाची साबळे यांनी आज (गुरुवारी) मोरवाडीतील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक बाबू नायर, माऊली थोरात, प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस संजय मंगोडेकर उपस्थित होते.

खासदार साबळे म्हणाले, संसदेचे पावसाळी अधिवेशन गेल्या सात दशकातील सर्वाधिक फलदायी ठरले आहे. लोकसभेत 36 तर राज्यसभेत 32 विधेयके संमत केली आहेत. त्यामध्ये तीन तलाक बंदी, दहशतवाद विरोधी, ग्राहक संरक्षण, माहिती अधिकार सुधारणा, कलम 370 सुधारणा, जम्मु-काश्मिर पुर्नरचना या विधेयकांचे समावेश आहे. लोकसभेचे कामकाज 135 टक्के झाले आहे.

लोकशाहीला धोका निर्माण करणारे 370 कलम रद्द केले आहे. त्यामुळे अखंड भारत निर्माण झाला आहे. याचा सर्वांना अभिमान आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहात जनतेला अभिप्रेत असे निर्णय होत आहेत, असेही खासदार साबळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.