RTO News : कोरोना साथीमुळे पिंपरी-चिंचवड आरटीओ मधील शिकाऊ अनुज्ञप्तींचे कामकाज पुढील आदेशापर्यंत बंद

एमपीसी न्यूज – कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयात कर्मचारी संख्या अर्ध्यावर आली असल्याने पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्तींचे कामकाज मंगळवार (दि. 6) पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. 

तसेच शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तींच्या शिबिर आणि दैनंदिन कोट्यामध्ये देखील कपात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पिंपरी-चिंचवडचे आरटीओ अतुल आदे यांनी दिली.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या मनुष्यबळावर कार्यालयातील अत्यावश्यक कामकाज चालवण्याचे देखील शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. मनुष्यबळ कमी झाल्याने कार्यालयातील कामकाजावर त्याचा परिणाम होणे साहजिक आहे. कामकाजात बदल करण्यात आला आहे.

आरटीओ कार्यालयात देखील 50 टक्के कर्मचारी उपस्थित असल्याने तिथल्या Addition of Class साठी शिकाऊ अनुज्ञप्तींचे कामकाज आज (मंगळवार, दि. 6) पासून पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात येणार आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या शिबीर कोट्यातील वाहन संवर्गाच्या कोट्यात देखील बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवार (दि. 5) पासून शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या कोविड पूर्व दैनंदिन उपलब्ध कोट्यात 75 टक्के कपात करण्यात आली आहे. शिकाऊ अनुज्ञप्तींचा पूर्वी असलेला 100 चा कोटा आता 24 एवढा असेल तर पक्की अनुज्ञप्तीसाठी पूर्वी 100 चा कोटा आता 28 एवढा असणार आहे.

वाहन संवर्गाच्या दैनंदिन कोट्यातही बदल करण्यात आला आहे. सोमवार (दि. 5) पासून हा बदल लागू झाला आहे. शिकाऊ आणि पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या कोविड पूर्व दैनंदिन कोट्यात 75 टक्के कपात करण्यात अली आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी पूर्वी 198 एवढा कोटा होता, तो आता 102 करण्यात आला आहे.

पक्की अनुज्ञप्तीसाठी बदल केलेला कोटा – पूर्वीचा कोटा (बदल करण्यात आलेला कोटा)

LMV (Tr) – 18 (9)

LMV (cab) – 3 (3)

3 W (GV) – 12 (6)

3 W (cab) – 3 (3)

LMV (NT) – 84 (42)

Trans – 6 (3)

MCWG – 78 (39)

MCWOG – 27 (14)

OTHERS – 6 (6)

Adpth Veh – 3 (3)

Total – 231 (128)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.