
Pimpri News : YCMH मधील रुबी हेल्थ केअर सेंटर महापालिकेने ताब्यात घ्यावे : योगेश बहल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या, दिवसेंदिवस हृद्वयविकाराच्या रुग्णांची वाढ लक्षात घेता महापालिकेने वायसीएम रुग्णायातील रुबी हेल्थ केअर सेंटरला दिलेली जागा परत घ्यावी. त्याठिकाणी सुसज्ज कार्डियक सेंटर आणि कॅथलॅब महापालिकेने चालवावी अशी मागणी माजी महापौर, स्थानिक नगरसेवक योगेश बहल यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात बहल यांनी म्हटले आहे की, वायसीएम रुग्णालयामध्ये महापालिकेने पीजी मेडिकल कॉलेज सुरु केले आहे. त्याअंतर्गत विविध शाखेचे तज्ज्ञ डॉक्टरांची भरती केली आहे. पीजी कॉलेजचा फायदा रुग्णालयातील रुग्णांना, कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेणा-या डॉक्टरांना होत असून भविष्यात सुद्धा होणार आहे.
वायसीएमएचमध्ये अनेक विभाग सुरु असून हजारो रुग्णांवर उपचार केले जातात. विविध शाखेचे डॉक्टर काम करत आहेत. पी.जी मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाखेचे तज्ज्ञ डॉक्टरांची भरती केली आहे. त्यामध्ये डॉ. ज्ञानेश्वर बो-हाडे, कार्डियक, सर्जन यांचा सुध्दा समावेश आहे. सध्या रुबी हेल्थ केअर सेंटरमध्ये 30 आयसीयू बेड, 1 सुसज्ज ओटी, 2 कॅथलॅब असे इन्फ्रास्ट्रक्चर कार्यरत आहे. या इन्फ्रास्ट्रक्चरचे रुबी हेल्थ केअर सेंटर महापालिकेला वार्षिक 15 लाख रुपये देते. त्यांच्याबरोबर महापालिकेने 2039 पर्यंत भाडेकरार केलेला आहे. रुबी हेल्थ केअर सेंटर उत्तम सेवा देत आहे. परंतु, अनेकवेळी गरीब रुग्णांना सवलत देणे अथवा बील माफ करणे, कमी पैशांमध्ये उपचारकरणे यासाठी अडचणी येतात.

शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता, दिवसेंदिवस हृद्वयविकाराच्या रुग्णांची वाढ होत आहे. महापालिकेकडे असलेले आयसीयू इतर आजाराकरीता अपुरे पडतात. अनेकवेळा गंभीर रुग्णांकरिता आयसीयूमध्ये बेड उपलब्ध नसते. त्यासाठी महापालिकेने वायसीएम रुग्णायातील रुबी हेल्थ केअर सेंटरला दिलेली जागा परत घ्यावी. डॉ. ज्ञानेश्वर बो-हाडे, कार्डियक सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक असलेल्या डॉक्टरांची नेमणूक करावी. सुसज्ज कार्डियक सेंटर आणि कॅथलॅब महापालिकेने चालवावे. जेणेकरुन हजारो गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल, असेही बहल यांनी निवेदनात म्हटले आहे.
