Pimpri: बाह्य जाहिरात धोरणाला विधी समितीची मंजुरी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील खासगी आणि महापालिकेच्या जागेवर जाहिरात करण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र असे ‘बाह्य जाहिरात धोरण 2018’ तयार केले आहे. या धोरणाला विधी समितीने आज (शुक्रवारी) मंजुरी देत अंतिम मान्यतेसाठी हे धोरण महासभेकडे पाठविले. महासभेची मान्यता  मिळाल्यानंतर प्रत्यक्षात या धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीची पाक्षिक सभा आज पार पडली. गेल्या दीड वर्षांपासून शहरातील खासगी आणि महापालिकेच्या जागेवर जाहिरात करण्याबाबत स्वंतत्र धोरण करण्याच्या सूचना सत्ताधा-यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. महापालिकेचे कोणतेही धोरण नसल्याने अनेक फलक अनधिकृत लावले जात होते. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत होता.

महापालिकेने तयार केलेल्या स्वतंत्र ‘बाह्य जाहिरात धोरणाअंतर्गत शहराची विभागनिहाय आणि रस्तानिहाय अशी द्विस्तरीय झोनिंग रचना तयार करण्यात आली आहे. विभागनिहाय झोनिंगमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा चार झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. झोन ‘अ’ हा विकसित आणि उच्च घनता विभाग असून त्यामध्ये मुख्य वाहुतक संक्रमण केंद्रे आणि प्रमुख रहिवासी स्थाने अशी सर्वाधिक जाहिराती क्षमता असलेली क्षेत्रे आहेत. झोन ‘ब’ मध्ये विकसनशील व्यापारी क्षेत्र असून त्यामध्ये कमी वाहतुक घनता असणा-या उपनगरीय क्षेत्राचा अंतर्भाव आहे. झोन ‘क’ मध्ये मिश्र वापर विकास क्षेत्र असून निवासी किरकोळ विकसित भाग असलेले मध्यम जाहिरात क्षमतेच्या क्षेत्राचा समावेश आहे. झोन ‘ड’ मध्ये किमान जाहिरात क्षमता आणि कमी वाहतुक घनता असलेल्या निवासी क्षेत्राचा समावेश आहे.

रस्तानिहाय झोनिंगमध्ये चार श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. त्यात श्रेणी एकमध्ये वाकड ते मुकाई चौक, राजीव गांधी उड्डाणपुल ते डांगे चौक, हॅरीस ब्रीज ते निगडी भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा ते मोशी टोल नाका, आकुर्डी डी. वाय. पाटील कॉलेज ते मुकाई चौक, चिंचवड स्टेशन ते चिंचवडगाव, बिर्ला रूग्णालय ते भुमकर चौक, पिंपरी चौक ते काळेवाडी पुल, नाशिक फाटा ते साई चौक, जगताप डेअरी ते हिंजवडी आणि भुमकर चौक ते विनोदे वस्ती, हिंजवडी टप्पा दोन या रस्त्यांचा समावेश आहे.

श्रेणी दोनमध्ये डांगे चौक ते बास्केट पूल, लांडेवाडी ते बजाज मटेरियल गेट, कुदळवाडी चौक ते चिंचवड स्टेशन, वाल्हेकरवाडी ते बास्केट पूल, काळेवाडी पूल ते कस्पटे वस्ती चौक, एम्पायर इस्टेट पुलाचा शेवट ते काळेवाडीतील एम.एम. शाळा या रस्त्याचा समावेश आहे. श्रेणी तीनमध्ये दिघी ते आळंदी, डुडुळगाव ते चिखली, चिखली ते तळवडे, बो-हाडेवाडी – मार्केटयार्ड ते सीएनजी पंप रस्ता, जय गणेश साम्राज्य ते कृष्णानगर चौक, 16 नंबर ते वाकड या रस्तयांचा समावेश आहे. तर, श्रेणी चारमध्ये शहरातील इतर सर्व रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

जाहिरातधारकाची ओळख पटण्याकरिता जाहिरातदार संस्थेने फलकाच्या रस्त्याकडील बाजूच्या खालील कोप-यात ठरवून दिलेल्या आकारात संस्थेचे नाव, पत्ता आणि परवाना क्रमांक नमुद करणे बंधनकारक आहे. परवाना संपण्याची मुदत महिना व वर्षे हे चिन्हांमध्ये लिहिणे आवश्यक राहणार आहे. अवैध व बेकायदा बाह्य जाहिरातींवर महापालिकेचे नियंत्रण राहील. अशा अवैध जाहिराती काढून टाकण्याचा, त्या नष्ट करण्याचा अधिकार महापालिकेला राहणार आहे. याशिवाय असे उल्लंघन करणा-या व्यक्तींना दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागणार आहे. या धोरणाला आज विधी समितीने मंजुरी देत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.