Pune News : काळा बाजार रोखण्यासाठी रेमडेसीव्हीर इंजेक्शन खरेदी-विक्री बाबत जिल्हाधिका-यांची नियमावली

रुग्णालयात मिळणार रेमडेसीव्हीर इंजेक्शन

एमपीसी न्यूज – रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी इंजेक्शनच्या खरेदी-विक्री बाबत पुणे जिल्हाधिका-यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मेडिकल दुकानदार आणि रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी कठोर उपाय करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

कोविड रुग्णालयाच्या संलग्न मेडिकल दुकानात या इंजेक्शनची विक्री केली जाईल. ज्या रुग्णालयाला संलग्न मेडिकल नाही, अशा रुग्णालयात हे इंजेक्शन मिळेल असे आदेशात म्हटले आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा पुरवठा कमी पडत असून त्याचा काळाबाजार व साठेबाजी केली जात आहे. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले आहे. रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार व साठेबाजी रोखण्यासाठी सर्व कोविड रुग्णालय संलग्न फार्मसी, मेडिकल स्टोअर, रेमडेसीव्हीर इंजेक्शनचे डिस्ट्रीब्युटर व कंपनीचे सी अॅण्ड एफ एजंट यांच्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिका-यांच्या आदेशात म्हटले आहे की –

रुग्णालयांनी कोविड रुग्णालय सुरु करण्यापूर्वी त्यांच्या हद्दीतील सक्षम आरोग्य अधिका-यांकडे कोविड हॉस्पीटल म्हणून नोंद करणे आवश्यक आहे. त्याची माहिती दररोज पुणे विभागाच्या डॅशबोर्डवर भरणे बंधनकारक आहे.

कोविड रुग्णालयाने त्यांचे रुग्णालय शासन मान्यताप्राप्त असलेले प्रमाणपत्र, त्यांचे संलग्न असलेले मेडिकल स्टोअरचे परवाने यांच्यासह घाऊक औषध विक्रेता किंवा सी अॅण्ड एफ एजंट यांचेकडे लेखी मागणी नोंदवावी.

रेमडेसीव्हीर इंजेक्शनची मागणी करताना रुग्णालयामधील रुग्णसंख्या विचारात घेऊन व ज्या रुग्णांना खरोखरच रेमडेसीव्हीरची आवश्यकता आहे अशी संख्या विचारात घेऊन तीन दिवस पुरेल एवढया इंजेक्शन साठयाची मागणी नोंदवावी. या औषधांची मागणी नोंदवण्यापूर्वी केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा कोविड क्लीनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल विचारात घेण्यात यावा.

_MPC_DIR_MPU_II

घाऊक औषध विक्रेत्यांनी किंवा सी अॅण्ड एफ एजंट यांनी रुग्णांच्या कागदपत्रांची योग्य प्रकारे शहानिशा केल्यानंतर संबंधीत रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे औषध पुरवठा करावा व त्याबाबतचे सर्व अभिलेख जतन करावे.

कोविड रुग्णालयाशी संलग्न नसलेल्या किरकोळ औषध विक्रेत्यांना रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा पुरवठा घाऊक औषध विक्रेत्यांनी करु नये.

सर्व घाऊक औषध विक्रेत्यांनी किंवा सी अॅण्ड एफ एजंट यांनी दररोज विक्री केलेल्या रेमडेसीव्हीर इंजेक्शनची माहिती (उदा. कोविड रुग्णालयाचे नाव, संलग्न मेडिकलचे नाव, बिल क्रमांक, दिनांक, एकूण विक्री संख्या इत्यादी) अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयास दररोज पाठवावी.

ज्या रुग्णालयांच्या आवारात संलग्न मेडिकल स्टोअर्स नाही त्यांनी स्वत: रेमडेसीव्हीर इंजेक्शनची खरेदी घाऊक औषध विक्रेते किंवा सी अॅण्ड एफ ऐजंटकडून करावी. तसेच औषधे व सौदर्य प्रसाधने कायदयातील तरतुदीनुसार औषध खरेदी व वितरणाबाबत अभिलेख ठेवावा. त्यामध्ये रजिस्टर ठेवून त्यात दिनांक दिवसाच्या सुरुवातीचा साठा, पुरवठादाराचे नाव, बिल क्रमांक खरेदी केलेला साठा, औषधाचे नाव, समूह क्रमांक, औषध पुरवठयाचा दिनांक, रुग्णांचा तपशील, पुरवलेले इंजेक्शन, डॉक्टरांचे नाव, आकारलेली किंमत इत्यादी माहिती अद्यावत ठेवावी. इंजेक्शनचा खरेदी, वापर, विक्री व शिल्लक साठा यांचा ताळमेळ ठेवावा.

रुग्णालयांनी स्वत: कोविड रुग्णांना औषधे उपलब्ध करुन दयावीत. रुग्णांच्या नातेवाईकास बाहेरुन घेऊन येण्यास सांगू नये.

कोविड रुग्णालयाने रुग्णांना औषधांची किंमत शासनमान्य दरानेच आकारावी. काही कारणाने रेमडेसीव्हीर इंजेक्शन या औषधाचा पूर्ण डोस देण्यात आला नाही तर त्याचा उर्वरित साठा हॉस्पीटल, मेडिकल स्टोअर्स यामध्ये परत करावा व त्याचे अभिलेख ठेवावे.

कोविड रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी यांचेवर बारीक लक्ष ठेवावे व रुग्णालयामध्ये गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालयात गैरप्रकार आढळून आल्यास रुग्णालय व्यवस्थापनास जबाबादार धरण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.