Pune News : “मसणात असणारी महिला महाकाली असते, राक्षसाचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते”

रूपाली ठोंबरे यांची ट्विटरच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

एमपीसी न्यूज : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. सुप्रिया सुळे यांच्यावर पाटील यांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली आहे. “तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी देखील आता चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. रूपाली ठोंबरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. “स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्या शिवाय शांत होत नसते. बेताल, सत्तापिपासू चंपा.” या भाषेत त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.

राज्यात एकीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापला असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरक्षणावरून टीकेची झोड सुरू आहे. भाजपकडून मंगळवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता. अनेक बडे नेते या मोर्चात सहभागी झाले होते. चंद्रकांत पाटील हे देखील या मोर्चात सहभागी होते. त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. तर सुप्रिया सुळे यांच्या विषयी बोलताना मात्र त्यांची जीभ घसरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.