Pimpri: रुपीनगर ठरतेय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’; आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह, मोशीतही एक रुग्ण!

आजपर्यंत 88 जणांना कोरोनाची लागण; 28 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी-रुपीनगर परिसर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरू लागला आहे. आज (सोमवारी) दोन पुरुष आणि एका महिलेचे असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुपीनगर परिसरात आजपर्यंत 15 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचा आकडा 61 वर पोहचला आहे. आजपर्यंत 89 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 28 जण कोरोनामुक्त झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने रविवारी (दि. 26) 116 जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये रुपीनगर परिसरातील रहिवाशी असलेल्या 28, 26 वर्षीय दोन पुरुषांचे आणि 25 वर्षाच्या एक महिलेचे असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. हायरिस्क कॉन्टॅक्टमधून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे रुपीनगर परिसर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरू लागला आहे. दरम्यान, 24 एप्रिल रोजी एकचदिवशी रुपीनगर परिसरातील तब्बल 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. 23 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णाच्या
हायरिस्क कॉन्टॅक्टमधून 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती. आजपर्यंत या परिसरातील 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मोशी येथील 27 वर्षीय तरुणाला हाय रिस्क कॉन्टॅक्टमधून कोरोनाची बाधा झाली आहे.

मागील वीस दिवसांत 64 नवीन रुग्णांची भर!

शहरात 8 एप्रिल पासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार, 17 एप्रिल रोजी दोन, 18 एप्रिल रोजी सात, 19, 20, 21 एप्रिल रोजी प्रत्येकी एकाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. 22 एप्रिल रोजी तीन, 23 एप्रिल रोजी तीन रुग्ण, 24 एप्रिल रोजी एकाच दिवशी 11 रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामध्ये आज 25 एप्रिल रोजी दोन, 26 एप्रिल रोजी एक आणि आज 27 एप्रिल रोजी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील वीस दिवसात तब्बल 64 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 88 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 28 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 61 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 49 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तर शहरातील नऊ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिका हद्दीबाहेरील तीन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा, सोमवारी (दि.20) निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि शुक्रवारी (दि. 24) निगडीतील एका पुरुष रुग्णाचा अशा चार जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.