Pimpri News : रशिया-युक्रेन युद्धाचा पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योगाला फटका

एमपीसी न्यूज – रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये प्रत्यक्ष युद्ध सुरु आहे. मात्र त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत. या युद्धामुळे अनेक देश चीन एवजी भारताकडून कच्च्या मालाची खरेदी करण्यास उत्सुक आहेत. या परिस्थितीत कच्च्या मालाची झालेली भाववाढ लहान उद्योगांचे कंबरडे मोडणारी आहे. मागील काही दिवसात तब्बल 15 टक्के भाववाढ झाली आहे. याचा मोठा फटका लहान उद्योगांना बसत आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्याने अमेरिका आणि ब्रिटन, फ्रांस हे युक्रेनच्या बाजूने उभे आहेत. तर चीन हा रशियाच्या बाजूने उभा आहे. या युद्धात भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे युद्धाच्या दृष्टीने भारत कोणत्याही गटात नाही. तरी देखील युद्धाची दाहकता भारतात पसरली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती हे त्याचेच उदाहरण आहे. या युद्धात चीन रशियाच्या बाजूने उभा राहिल्याने अनेक देश चीनला बगल देऊन भारताकडून माल खरेदी करू लागले आहेत. विशेषतः लोखंड, स्टेनलेस स्टील, इतर धातू आणि उद्योगासाठी लागणारे इतर साहित्य भारतातून अनेक देशांना पाठवले जाते.

भारतात टाटा, जिंदाल, लक्ष्मी मित्तल, सेल अशा मोजक्याच कंपन्या पोलाद निर्मिती, निर्यात करतात. त्यामुळे या कंपन्यांनी निर्यात धोरणावर भर दिला असल्याने देशात पोलाद, स्टीलचे भाव वाढले. कोरोना साथीच्या कालावधीत देखील काही प्रमाणात भाववाढ झाली. मात्र कोरोना साथीचा संसर्ग कमी झाल्यानंतर या किमती स्थिरावल्याचे चित्र होते. रशिया-युक्रेन युद्ध सुरु होताच पुन्हा या किमतींनी उसळी घेतली आहे.

लघु उद्योग भारती संघटनेचे अध्यक्ष दीपक फल्ले सध्या सुरु असलेल्या भाववाढीबद्दल ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना म्हणाले, रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर उद्योगासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमतीत 15 टक्क्यांनी वाढ झाली. लघुउद्योजक ट्रेडर्सकडून माल खरेदी करतात. सातत्याने भाववाढ होत असल्याने अनेक ट्रेडर्स अधिक नफा कमावण्याच्या हेतूने मालाची शोर्टेज करतात. ट्रेडर्स लहान उद्योजकांना क्रेडीट देत नाहीत. क्रेडीट नसणा-या लहान उद्योगांणा मोठ्या कंपन्या भाव देत नाहीत.

कच्च्या मालाचे भाव एका रात्रीत वाढतात. पण लहान उद्योगांचे उत्पन्न तेवढेच आहे. उलट भाववाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आणि नफा कमी झाला आहे. मार्च महिन्यात तर लहान उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. भारतात कच्च्या मालाची उपलब्धता वाढण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत, असेही दीपक फल्ले यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी देखील सध्या सुरु असलेल्या कच्च्या मालाच्या भाववाढ आणि लहान उद्योगांची फरफट याबाबत ‘एमपीसी न्यूज’ला माहिती दिली. मागील दीड वर्षांपासून भाववाढ सुरु आहे. कोरोनानंतर 38 रुपये किलो असलेले स्टील एकदम 76 रुपयांपर्यंत पोहोचले. युद्धापासून 15 टक्के भाववाढ झाली. स्टेनलेस स्टीलचे दर 220 रुपये प्रती किलोवरून 300 रुपये प्रती किलो एवढे प्रचंड वाढले. इतर मशिनरी, कच्च्या मालाच्या किमतीबाबत हीच अवस्था असल्याचे बेलसरे म्हणाले.

मार्च महिना असल्याने मोठ्या कंपन्यांकडे पैसे वाढवून मागता येत नाहीत. तरीही सध्या सुरु असलेल्या परिस्थितीबाबत सांगितले असता मार्च नंतर बघू असे सांगितले जाते. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात असलेल्या 11 हजार उद्योगांना तब्बल 200 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता देखील संदीप बेलसरे यांनी व्यक्त केली.

रशिया-युक्रेन हे युद्ध आणखी काही दिवस सुरु राहिले तर उद्योगासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमतीत आणखी 8 – 9 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक लहान उद्योजकांना मार्च महिन्यातील ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कर्ज काढावी लागली आहेत. ही दरवाढ त्वरित थांबवण्याची मागणी शासनाकडे केली असल्याचेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.