Pimpri : टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे – सचिन साठे

पाणी कपातीच्या विरोधात काँग्रेसचा महापालिकेवर मोर्चा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. टँकर लॉबीला पोसण्यासाठी आयुक्तांनी नागरिकांवर दिवसाआड पाणी कपात लादली आहे. ‘धरण घशाला, कोरड उशाला’ अशी शहरातील करदात्या नागरिकांची अवस्था झाली आहे. सत्ताधा-यांचे आयुक्तांवर नियंत्रण नाही आणि आयुक्तांचा प्रशासनावर अंकुश नाही. नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणा-या आणि निष्क्रीय प्रशासनाला पाठीशी घालणा-या आयुक्त श्रावण हर्डीकर यांची ताबडतोब बदली करावी व या विषयाशी संबंधित जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

काँग्रेसच्या वतीने आज (सोमवारी) पाणी कपातीच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर हैद्राबाद येथे सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या डॉक्टर तरुणीस व रविवारी रात्री दापोडी येथे ड्रेनेजचे काम करीत असताना मृत्यू झालेल्या अग्नीशामक दलाचे जवान विशाल जाधव आणि मजूर नादप्पा जमादार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून अहिल्याबाई होळकर चौकात महानगरपालिकेच्या प्रवेशव्दारासमोर आला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी साठे यांनी केलेल्या मागणीनुसार पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यास आले होते.

यावेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, तुकाराम भोंडवे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, बिंदू तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंके, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, ॲड. क्षितीज गायकवाड, प्रियदर्शनी सेलच्या अध्यक्षा विनिता तिवारी, आशा शहाणे, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नेते मेहताब इनामदार, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, मोहन अडसूळ, कुंदन कसबे, व्ही.एस.कबीर, विठ्ठल कळसे, भाऊसाहेब मुगूटमल, सुनील राऊत, व्हि.जे. खंडाळे,  कळसकर, कादीर खान, ॲड. मोहन आडसुळ, हिरामण खवळे, सचिन नेटके आदी उपस्थित होते.

सचिन साठे म्हणाले की, पाणीगळती व पाणीचोरी रोखण्यास मनपा प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. शहरातील नागरिक वेळोवेळी पाणीपट्टीसह सर्व कर महापालिकेच्या तिजोरीत करदाते भरतात. मिळकत कर व पाणीपट्टी कर थकवणा-या नागरिकांवर जप्तीच्या नोटीसा बजावल्या जातात. सेवा न देता दडपशाही करणा-या अधिका-यांवर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांना प्राथमिक सेवा, सुविधा देणे ही महापालिका प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांना पाणी देण्याऐवजी टँकर लॉबी पोसण्याचा उद्योग प्रशासन करीत आहे. ज्या सोसायट्यांना खासगी टँकरव्दारे पाणी घ्यावे लागते. त्यांना महापालिकेने टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा. या टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे. नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणा-या आणि निष्क्रीय प्रशासनाला पाठीशी घालणा-या आयुक्त श्रावण हर्डीकर यांची ताबडतोब बदली करावी व या विषयाशी संबंधित जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी.

धरणात मागील वर्षीपेक्षा जास्त जलसाठा आजही आहे. चालू वर्षी जास्त झालेल्या पावसामुळे धरणक्षमतेच्या चौपट पाणी नदीव्दारे विसर्ग करून सोडण्यात आले. पुढील वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असतानाही निव्वळ आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांना अपु-या पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आयुक्तांचे नियोजन म्हणजे त्यांच्या अपयशाची व अकार्यक्षमतेची कबूलीच आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीत शहरभर चोवीस तास पुरेशा दाबाने आणि शहराला बंद जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा करू असे आश्वासन भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. त्याचा विसर आता पदाधिका-यांना पडला आहे, अशीही टीका साठे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.