Shashi Tharoor: सचिन तेंडुलकर चांगला कर्णधार होऊ शकला असता पण, त्याने अपेक्षाभंग केला- शशी थरुर

सचिनकडे 1996 साली भारतीय संघाचं कर्णधारपद देण्यात आलं. 73 वन-डे सामन्यांमध्ये सचिनने भारताचं नेतृत्व केलं, ज्यात फक्त 23 सामने भारत जिंकू शकला तर 43 सामन्यांत भारताला हार पत्करावी लागली.

एमपीसी न्यूज – सचिनकडे कर्णधारपद येण्याआधी मला नेहमी वाटायचं की सचिन हाच कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार आहे. ज्यावेळी तो कर्णधार नव्हता तेव्हा मैदानात तो खूप सक्रिय असायचा. तो स्लिपमध्ये फिल्डींग करायचा आपल्या कर्णधाराला गरज असल्यास सल्ला देण्यासाठी धावपळ करायचा, आपल्या सहकाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायचा. त्यामुळे मला नेहमी वाटायचं सचिनला कर्णधारपद द्यायला हवं. पण ज्यावेळी सचिनकडे कर्णधारपद आलं, त्यावेळी मात्र अपेक्षाभंग झाला, असे मत काँग्रेस नेते शशी थरुर यांनी व्यक्त केलं आहे.

शशी थरुर स्पोर्ट्स कीडा या क्रीडा विषयक संकेतस्थळाशी बोलत होते. ते म्हणाले, सचिन तेंडुलकरला कर्णधारपदाच्या काळात फारशी भक्कम टीम मिळाली नाही. हे जरी खरं असलं तरीही कर्णधार म्हणून सचिनची कामगिरी फारशी चांगली नव्हती. सचिनही हे मान्य करेल.

सचिनकडे 1996 साली भारतीय संघाचं कर्णधारपद देण्यात आलं. 73 वन-डे सामन्यांमध्ये सचिनने भारताचं नेतृत्व केलं, ज्यात फक्त 23 सामने भारत जिंकू शकला तर 43 सामन्यांत भारताला हार पत्करावी लागली.

कसोटी क्रिकेटमध्येही सचिनची कर्णधार म्हणून कामगिरीही ही खराब राहिलेली आहे. एकूण 25 कसोटी सामन्यांत सचिनने भारताचं प्रतिनिधित्व केलं. ज्यात फक्त 4 कसोटी सामने भारताने जिंकले तर 9 सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला. उर्वरित सामने अनिर्णित राहिले.

थरुर यांच्या मते कर्णधारपदाच्या काळात सचिनला स्वतःच्या फलंदाजीचाही विचार करावा लागत असल्यामुळे तो फारसा चांगला कर्णधार होऊ शकला नाही. यानंतर सचिनने स्वतः कर्णधारपद सोडून फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. यानंतर गांगुलीच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा सचिनला कर्णधारपदासाठी विचारणा झाली होती, ज्याला सचिनने नकार दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.