Most Disliked Trailor: सडक 2 ठरला सर्वाधिक डिसलाईक मिळालेला ट्रेलर

Sadak 2 became the most disliked trailer ‘प्रेम करणारे आणि राग करणारे लोकं हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही दोघांनीही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि चित्रपट टॉप ट्रेंडमध्ये असल्याची खात्री करुन दिली

एमपीसी न्यूज – गेले काही महिने मनोरंजनसृष्टीला फारच वाईट गेले आहेत. आधी करोनाची साथ, त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजूपतच्या आत्महत्येनंतर उठलेले वेगवेगळे वाद, चित्रपटगृहे, शूटिंग बंद असणे या गोष्टींमुळे सगळेच ठप्प झाले आहे. काही चित्रपट बनवून तयार आहेत. तर चित्रपटगृहे बंद आहेत. म्हणून मग ते ओटीटीवर रिलीज होत आहेत. त्यातच सुशांतच्या आत्महत्येवरुन अनेक वाद सुरु झाले. त्यात घराणेशाही हा वाद मोठा ठरला. त्यानंतर स्टार किड्स आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते यांच्यावर सुशांतच्या चाहत्यांनी निशाणा साधला. खास करुन महेश भट्ट यांच्या कुटुंबीयांना ट्रोल करण्यात आले.

याच काळात संजय दत्त, पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला महेश भट्ट यांच्या ‘सडक 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित होताच यूट्यूबवर 24 तासात सर्वाधिक डिसलाइक मिळालेला ट्रेलर ठरला. आता पूजा भट्टने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘प्रेम करणारे आणि राग करणारे लोकं हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही दोघांनीही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि चित्रपट टॉप ट्रेंडमध्ये असल्याची खात्री करुन दिली त्याबद्दल तुमचे आभार’ असे पूजा भट्टने ट्विटमध्ये म्हटले आहे.

पूजाच्या या ट्विटवर महेश भट्ट यांच्या पत्नी आणि आलियाची आई सोनी राजदान यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी ‘अतिशय हुशार मुलगी आणि तू सांगितलेलं सत्य आहे’ असे म्हटले आहे.

हे सगळे कमी आहे की काय म्हणून संजय दत्तला कॅन्सर झाल्याचे समजले. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम सडक 2च्या ट्रेलरवर नक्कीच झाला असणार.

महत्वाची गोष्ट म्हणजे ‘सडक 2’ या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सडक’ या चित्रपटाला त्यावेळी प्रचंड यश मिळाले होते. त्यामुळे ‘सडक 2’ कडून प्रेक्षकांच्या नक्कीच मोठ्या अपेक्षा आहेत.

या चित्रपटाच्या तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रत्येक भूमिकांची ओळख करण्यात आली असून कथेची झलक पाहायला मिळते. हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.