Pimpri: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील (पीसीएनटीडीए) 13 वर्षाची प्रशासकीय राजवट अखेर संपुष्टात आली आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची आज (शुक्रवारी)नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने ही नियुक्ती केली असून खाडे यांच्या नियुक्तीमुळे अखेर निष्ठावान गटाला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. 

राज्य सरकारने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्त्या आज जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची वर्णी लागली आहे.

नियोजनबध्द व सर्वांगिण विकास करणे व विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक,वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 14 मार्च  1972  मध्ये स्थापना झालेली आहे. प्राधिकरणावर गेल्या 13 वर्षांपासून प्रशासकीय राजवट होती. काही वर्ष प्राधिकरण अध्यक्षपदाची प्रभारी जबाबदारी ही पुणे विभागीय आयुक्तच सांभाळीत होते. 26 ऑक्‍टोबर 2017 ला या पदाची अतिरिक्त जबाबदारी तत्कालीन पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता.

मध्यतंरी प्राधिकरण पुणे महानगर प्रादेशिक विकास महामंडळ (पीएमआरडीत)विलिन करण्याचे सूतोवाच पुण्याच्या पालकमंत्र्यांनी केले होते. त्यामुळे प्राधिकरण विलिन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, आज अचानक सरकारने प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खाडे यांची नियुक्ती केली आहे. खाडे यांची यापूर्वीच निवड निश्चित झाली होती. परंतु, विविध कारणाने नियुक्ती रखडली जात होती. आज अखेर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खाडे यांची नियुक्ती झाली आहे.  खाडे यांच्या नियुक्तीमुळे अखेर निष्ठावान गटाला न्याय मिळाल्याची प्रतक्रिया व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सदाशिव खाडे हे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थ आहेत. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची साथ दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.