Thane News : संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल असा सदाशिव टेटविलकर यांचा “गावगाडा”

एमपीसी न्यूज : समाजव्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी सामुहिकपणे निर्माण केलेली गावगाडा ही पध्दती दीड हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात असून सदाशिव टेटविलकर यांनी या गावगाड्याचे स्वरुप इतक्या सुंदर पध्दतीने आणि कुशलतेने रेखाटले आहे त्याचा उपयोग निश्चितच संदर्भ ग्रंथ म्हणून होईल अशा भावना भारत इतिहास संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. बी.डी. कुलकर्णी यांनी आपल्या शुभसंदेशातून व्यक्त केल्या.

कोकण इतिहास परिषद, श्रीकृपा प्रकाशन व मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर लिखीत “गावगाडा – प्राचीन ते अर्वाचीन” या पुस्तकाचा जाहीर प्रकाशन समारंभ कोव्हीडच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. फेसबुक लाईव्हव्दारे या पुस्तकाचे अनौपचारिक प्रकाशन निवडक उपस्थितीत मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, लेखक सदाशिव टेटविलकर, कोकण इतिहास परिषदेच्या प्रवक्त्या डॉ. विद्या गाडगीळ व प्रकाशक  विश्वनाथ साळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांनी शुभसंदेशाव्दारे सदाशिव टेटविलकर समर्पित भावनेने करीत असलेल्या इतिहास संशोधन कार्याची प्रशंसा करीत गावगाडा पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या हरवलेल्या संस्कृतीची माहिती नव्या पिढीला होईल असा विश्वास व्यक्त केला.

ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली असून त्यामध्ये त्यांनी शहरांची महानगरे झाली असली तरी गावगाड्यासारख्या मुळांच्या जोरावरच आपली संस्कृती व इतिहास जपला जातो व आपले माणूसपण घडत असते असे म्हटले आहे.

इतिहासाचे भान देण्याचे काम सदाशिव टेटविलकर आपल्या विविध साहित्य संपदेतून करीत असून या पुस्तकातील संदर्भ माझ्यासारख्या प्रशासकिय अधिका-याला कामात उपयोगी पडू शकतात तसेच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांनाही या पुस्तकाचा उपयोग होईल असे त्यांनी नमूद केले आहे. समतोल पध्दतीने इतिहास सांगणारे इतिहासकार म्हणून सदाशिव टेटविलकर यांची नोंद ठाण्याच्या इतिहासाला घ्यावीच लागेल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे.

महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर, इतिहास संशोधक डॉ. बी.डी. कुलकर्णी यांच्या शुभसंदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले. ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी या पुस्तकाव्दारे इतिहासाचे व समाज जीवनाचे नवे दालन अभ्यासकांसाठी खुले झाले असल्याचे सांगत ग्रंथ संग्रहालयातील ऐतिहासिक पुस्तकांचा विभाग समृध्द करण्यासाठी सदाशिव टेटविलकर यांनी पुढाकार घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. कोरोनाच्या काळाने खूप काही शिकविले असून यापुढील काळात अधिक जोमाने लिखाण करण्याची उमेद इतिहास लेखक संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.