Bhosari : सफारी पार्कमुळे स्थानिकांना रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळणार – तुषार सहाणे

एमपीसी न्यूज – मोशी येथे सिंगापूर येथील सेन्टॉस्सा पार्कच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’ साकारण्यात येणार आहे. यामुळे समाविष्ट गावांसह परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे, असे मत शिवसैनिक तुषार सहाणे यांनी व्यक्त केले.

सफारी पार्कसाठी सुमारे 1 हजार 500 ते 1 हजार 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तातडीने एफडीआयच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. उर्वरित निधी राज्य सरकार आणि महापालिका उभारणार आहे.  तीन वर्षात सफारी पार्क साकारणार असून पिंपरी महापालिका आणि एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने सफारी पार्कचे काम करण्यात येणार आहे.

तुषार सहाणे म्हणाले, “महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसाठी ही आनंदाची बाब आहे. मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सफारी पार्क’ विकसित होणार असल्याने समाविष्ट गावाच्या विकासांना आणखीन चालना मिळणार आहे. सिंगापूरमधील सेन्टॉस्सा पार्कच्या धर्तीवर हा सफारी पार्क साकारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट झालेल्या मोशी, चिखली, च-होलीचा भाग वेगाने विकसित होत आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्प याठिकाणी हाती घेतले आहेत.

महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांच्या पायाभूत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. चिखली, मोशी, च-होली आदी भागांतील विविध महत्त्वाकांक्षी  प्रकल्प हाती घेतले आहेत. सफारी पार्कमुळे या भागातील उद्योग-व्यावसायाची वृद्धी होणार आहे. तसेच, स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतील. यासह बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाविष्ट गावांना संजिवनी देण्याचे ‘व्‍हीजन’ आमदार महेश लांडगे यांनी ठेवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.