Sahakarnagar Crime News : ‘आमचा नाद नाही करायचा’, असे म्हणत अल्पवयीन तरुणांकडून एकावर कोयत्याने वार

एमपीसीन्यूज : पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या घराचा दरवाजा तोडून दोघा अल्पवयीनांसह टोळक्याने त्याला बाहेर ओढून कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हातात कोयता घेत नागरिकांच्या घरावर दगडफेक करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना तळजाई वसाहत परिसरात घडली.

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मयुर रंगनाथ आरडे (वय २०, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आठ ते नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुले आणि मयूर यांच्यामध्ये पूर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी रविवारी पहाटे मयूर यांच्या घराजवळ गेले. मयूर घरात झोपलेले असताना त्यांनी घराचा दरवाजा तोडून त्याला ओढत घराबाहेर आणले.

त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार केला. मयूरने वार हातावर अडविल्यामुळे त्यांच्या हाताची बोटे तुटली आहेत. इतर आरोपींनी मयूरला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

आरोपींनी परिसरात फिरून आरडा-ओरडा करत हातात कोयता फिरवरून दहशत निर्माण केली. शेजारच्या काही घरांवर दगडफेक करत आमचा नाद करायचा नाही, अशी दमबाजी केली.

नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी सहकारनगर पोलिस अधिक तपास करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.