Sahitya Amrit Granthotsav : महापालिकेतर्फे 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान ‘साहित्य अमृत ग्रंथोत्सव’ व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे (Sahitya Amrit Granthotsav) औचित्य साधून ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 13 ते 21 ऑगस्ट 2022 या कालावधीत भव्य ‘साहित्य अमृत’ ग्रंथोत्सव तसेच व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शहराची सांस्कृतिक ओळ्ख ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे साहित्यप्रेमींनी या ग्रंथोत्सवात उस्फुर्तपणे सहभागी व्हावे तसेच विविध विषयांवरील व्याख्यानांचा देखील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

चिंचवड येथील महापालिकेच्या प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ग्रंथ दिंडीचे उद्घाटन आयुक्त पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता ‘साहित्य अमृत’ ग्रंथोत्सव तसेच व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते ‘महानायक ते महासम्राट’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

PCMC News : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम

14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ज्येष्ठ चरित्र आणि निसर्ग लेखिका विणा गवाणकर यांच्याशी ‘चरित्र लेखन – एक प्रवास’ या विषयावर मुक्त संवाद आयोजित करण्यात आला आहे. नामवंत कवी तथा गझलकार अनिल आठलेकर हे विणा गवाणकर यांची मुलाखत घेणार आहेत. दुपारी 12 ते 2 दरम्यान आजादी के दिवाने या पुस्तकाचे संपादक अनिकेत यादव यांचे ‘क्रांतीपर्वातील मूक साक्षीदार व भारतीय आरमाराची गौरव परंपरा’ या विषयावर व्याख्यान होईल.

16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर दैनिक लोकमतचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच, सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे ‘स्वातंत्र्याच्या वाटचालीतील मराठी साहित्याचे योगदान’  या विषयावर व्याख्यान होणार आहे. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता समाजसेवक, तंत्रज्ञ तसेच ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे ‘भारताची सद्य आर्थिक स्थिती’ या विषयावर व्याख्यान पार पडणार आहे. नागरिकांनी महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या या सर्व कार्यक्रमांसह ‘घरोघरी  तिरंगा’ या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिका (Sahitya Amrit Granthotsav) प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.