Hadpsar : महिलांच्या सखी बूथने वेधले मतदारांचे लक्ष

प्रत्येक महिलेचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत  

एमपीसी न्यूज –  हडपसर येथील साधना महाविद्यालयातील सखी बूथने सर्व मतदारांचे लक्ष वेधले. मतदानासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या बूध मधील सर्व काम महिला कर्मचारी पाहत असून त्या गुलाबी रंगाच्या पोषाखात होत्या.

शिरुर लोकसभा मतदारसंघात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान झाले. यावेळी प्रथमच महिलांसाठी विशेष सखी बूथ प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार करण्यात आला आहे.हडपसर येथील साधना महाविद्यालयात आज सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. येथील सखी बूथ सर्वांना आकर्षित करीत होता.

या बूथ बाहेर फुगे लावले, रांगोळी काढण्यात आली, सेल्फी पॉईंट आणि लहान मुलांसाठी पाळणा ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रत्येक मतदार या बुथवर क्षणभर तरी थांबला होता. या बुथवर पुरुषांसाठी आणि महिलांकरिता स्वतंत्र लाईन करण्यात आली होती. प्रत्येक महिलेला गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात येत होते. अशा प्रकारची सेवा पहिल्यांदाच मिळाल्याने महिलांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता. तसेच त्यांच्या चेह-यावर समाधानही पाहण्यास मिळाले. महिला वर्गातून या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.

या उपक्रमाबाबत मतदान करण्यासाठी आलेल्या अनेक महिलांशी संवाद साधण्यात आला. यावेळी संगीता पवार म्हणाल्या की, मी लोकसभा आणि विधानसभा मिळून दहा वेळा मतदान केले. मतदान करण्यासाठी आल्यावर गुलाबाचे फूल देऊन स्वागत किंवा लहान मुलांसाठी बाहेर पाळणा असे केव्हाच पाहिले नव्हते. मात्र यंदा प्रथमच अशी सुविधा पाहिल्याने खूप छान वाटले आहे. अधिकारी वर्गाकडून प्रत्येक मतदाराची देखील प्रत्येक क्षणाला विचारपूस करीत असल्याचे पाहून एक समाधान लाभले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मीनाक्षी गरुड म्हणाल्या की, मी आजअखेर किमान लोकसभेचे तीन वेळा मतदान केले आहे. पण यंदा प्रथमच मतदान बुथवर एका महिलेकडून दुसर्‍या महिलेचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत होणे पाहिलीच वेळ आहे. हे पाहून छान वाटले. असे उपक्रम वाढल्यास भविष्यात निश्चित मतदानाची आकडेवारी वाढण्यास देखील मदत होईल अशी भावना व्यक्त करीत सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजवावा, असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.