Sakshi Malik To PM: मी असं कोणतं पदक जिंकून आणू जेणेकरून मला अर्जुन पुरस्काराचा सन्मान मिळेल? 

एमपीसी न्यूज – यंदाच्या पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, 13 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, 27 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, 15 खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळण्यात आले असून पंतप्रधान मोदी यांना थेट सवाल करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याच्यासह पाच क्रीडापटूंना यंदाचा मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. याशिवाय, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. कुस्तीपटू साक्षी मलिक हिला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळण्यात आले असून पंतप्रधान मोदी यांना थेट सवाल करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

साक्षी मलिक ट्वीट् करत असे म्हणाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री किरेन रिजीजू, मला खेलरत्न पुरस्काराने (2016 मध्ये) सन्मानित करण्यात आलेले आहे. या सन्मानाचा मला अभिमान आहे. क्रीडाविश्वाशी निगडीत सर्व पुरस्कार जिंकावेत असं प्रत्येक क्रीडापटूचं स्वप्न असतं. त्यासाठी क्रीडापटू खेळताना आपलं सर्वस्व पणाला लावतात. माझंही स्वप्न आहे की मला अर्जुन पुरस्कार मिळावा. यासाठी मी असं कोणतं पदक जिंकून आणू जेणेकरून मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल? की माझ्या नशिबात हा पुरस्कारच नाहीये? असा सवाल तिने आपल्या ट्विटच्या माध्यमातून थेट पंतप्रधान मोदी यांना विचारला.

खेलरत्न पुरस्कार विजेत्या साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार देता येणार नाही, असा निर्णय शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.