BNR-HDR-TOP-Mobile

जागते रहो’ कार्यक्रमातून भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला मानवंदना (व्हिडिओ)

मराठी सिनेनाट्यसृष्टीतील कलाकारांचा पुढाकार

एमपीसी न्यूज- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याने प्रत्येक संवेदनशील मन व्यथित झालं. आपण शहिदांच्या कुटुंबियांचं दु:ख कमी नाही करू शकतं; निदान त्यांच्याबाबतीत संवेदनशील तरी राहू शकतो या विचाराने मराठी सिनेनाट्य सृष्टीतील काही कलावंत मंडळींनी एकत्र येत पुलवामा हल्ल्यातील शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी ‘जागते रहो’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

‘दूर व मुक्त अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठ’ व ‘प्रणाम भारत कला अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २८ मार्चला सायंकाळी ५.०० वाजता मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठ, कालिना सांताक्रुझ येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शहिदांप्रती कृतज्ञतेसोबतच आजच्या तरूणाईच्या मनात ‘नेशन फर्स्ट’ म्हणजे नेमके काय व त्याबाबत जागृती निर्माण करणारा हा कार्यक्रम असणार आहे. केवळ मनोरंजनपर असे या कार्यक्रमाचे स्वरूप नसून विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करत आपल्या सैन्य दलाची नव्याने ओळख घडवून देण्याचा हा प्रयत्न असेल.

या कार्यक्रमाविषयीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले की, सैन्याची मानसिकता नेमकी कशी असते हे दाखवतानाच प्रत्येकाने आपल्या कर्तव्याबाबत सजग राहणे ही तेवढचं गरजेचं आहे. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून या गोष्टी आपण अमलात आणू शकतो याची जाणीव उद्याच्या भविष्याला (विद्यार्थ्यांना) करून देण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

आपलं संपूर्ण जगणं व काम आपल्या राष्ट्राशी कशाप्रकारे निगडीत असू शकतं? तसेच आपली देशभक्ती केवळ जयघोषापुरती न राहता तिचा सखोल व सजग अर्थ समजून देत विचाराने प्रवृत्त करणारा हा कार्यक्रम असेल असं लेखक अभिराम भडकमकर यांनी यावेळी सांगितले.

आपल्या जीवाची बाजी लावणारे सैनिक आपल्यासाठी खरे ‘सेलिब्रिटी आयकॉन’ असायला हवेत, असं मत व्यक्त करतानाच आपल्या तीनही सैन्यदलाची यंत्रणा कशाप्रकारे कार्यरत असते हे विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याचे निर्माते अनंत पणशीकर यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनुराधाताई गोरे, अनुराधाताई प्रभुदेसाई यांच्या व्याख्यांनाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार असून एअर मार्शल सुनील सोमण, लेफ्ट.कर्नल गडकरी, व्हॉइस अॅडमिरल अभय कर्वे हे मान्यवर वक्ते सैन्यदलासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यासोबत सेलिब्रिटी व्हिडिओ, देशभक्तीपर गीतगायन या आणि अशा अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण यात होणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना पद्मश्री वामन केंद्रे, पुरुषोत्तम बेर्डे, प्रमोद पवार, अनंत पणशीकर, जयेंद्र साळगावकर अभिराम भडकमकर, राजन भिसे, संजय पेठे, प्रसाद महाडकर, चंद्रशेखर सांडवे, डॉ. अमोल देशमुख, कुणाल रेगे, अभिषेक मराठे यांची आहे. मार्गदर्शक श्री. दीपक मुकादम (मा. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समिती सदस्य, मुंबई विद्यापीठ), डॉ. शेफाली पंड्या (संचालक – दूर व मुक्त अध्ययन संस्था, मुंबई विद्यापीठ) यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3