Pune News : पुण्यात पारंपरिक पालखी सोहळ्याद्वारे शिवरायांना नमन

एमपीसी न्यूज : शिवछत्रपतींची प्रतिमा पालखीत ठेऊन केलेले पूजन…पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला… रांगोळीच्या पायघडया व फुलांची उधळण आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण… अशा शिवमय झालेल्या वातावरणात शहराच्या पूर्व भागातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात पारंपरिक पालखी सोहळा हे यंदाचे मुख्य आकर्षण ठरले.

यावेळी करवीर पीठाचे श्रीमद्् जगद््गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे 13 वे वंशज विक्रमसिंह बाजी मोहिते, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, खजिनदार सचिन भोसले, उत्सव प्रमुख दत्ता काळे, कृष्णा परदेशी आदी उपस्थित होते. मंडळाचे मंगेश शिंदे, रवींद्र भन्साळी, ओंकार नाईक, कुणाल जगताप आदींनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला. शिवजयंती उत्सवाचे यंदा 38 वे वर्ष आहे.

पालखीतील शिवप्रतिमेचे पूजन श्रीमद्् जगद््गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांच्या हस्ते झाले. त्यानंतर फुलांची उधळण करीत स्थानिक महिला व कार्यकर्त्यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी विनोद आढाव यांच्या कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर मर्दानी आखाडामधील कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच जयनाथ मित्र मंडळ धनकवडी मधील ढोल-ताशा पथक व सोलापूर टेंभूर्णी येथील ओम श्री हलगी पथकाच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला.

किशोर चव्हाण म्हणाले, सार्वजनिक स्वरुपात शिवजयंती उत्साहात साजरी व्हायलाच हवी. मात्र, घराघरात शिवजयंती साजरी व्हावी, याकरीता मंडळातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. याकरीता मंडळाच्या वतीने छत्रपती शिवरायांची प्रतिमा(मूर्ती) घरोघरी भेट देण्यात आली आहे. मंडळाचा कार्यकर्ता मूर्ती भेट देण्यासाठी गेला असता माता-भगिनींनी पारंपारिक पध्दतीने औक्षण करुन स्वागत केले जात आहे.

प्रत्यक्ष शिवजयंतीच्या दिवशी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी होईल व घरोघरी शिवचरित्राचे वाचन होईल यासाठी मंडळाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. याशिवाय ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा, एक महिना शिवरायांवर आधारित ऐतिहासिक चित्रपट दाखविणे, महिलांकरीता विविध स्पर्धा असे उपक्रम देखील राबविण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.