Pimpri News : संभाजी ब्रिगेडचा अर्धनग्न महामोर्चा तात्पुरता स्थगित

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री श्री रवीशंकर यांच्यावर गुन्हा दाखल न केल्याप्रकरणी शासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी ते मुंबईपर्यंत पायी चालत अर्धनग्न महामोर्चा आज (रविवारी) आयोजित केला होता. मात्र, पोलिस प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा तात्पुरता स्थगित केला असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी दिली आहे. 

जानेवारी 2020 मध्ये श्री. श्री. रवीशंकर यांच्याकडून यु-ट्युबवर प्रसारित केलेला व्हीडिओ, कॅलेंडर तसेच विविध लेखांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची खोटा इतिहास मांडून बदनामी केल्याचे पिंपरी-चिंचवडमधील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. याप्रकरणी विविध निवेदने देऊन व  आंदोलने करूनसुद्धा पोलीस प्रशासनाने रवीशंकर व इतर दोषींवर गुन्हा दाखल केला नाही. यामुळे शिवप्रेमी व संतप्त संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न महामोर्चाचे आयोजन केले होते.

पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सतिश काळे यांना लेखी निवेदन देऊन कारवाईचे आश्वासन दिले आहे. लवकरात लवकर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.