Pune : संभाजी उद्यान मेट्रो स्थानक व डेक्कन स्थानक यांना पादचारी पुलाद्वारे पेठ भागांशी जोडणार

एमपीसी न्यूज – डेक्कन स्थानक डेक्कन पीएमपीएमएल बस स्थानकाच्या जवळ नदी किनारी असून कर्वे रस्ता, खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, आपटे रस्ता व जंगली महाराज रोडपासून जवळ असल्यामुळे या परिसरातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. डेक्कन स्थानकाचा अधिकाधिक लोकांना लाभ करून देण्यासाठी नदीवर पादचारी पूल बांधून नारायण पेठेचा भाग देखील जोडण्यात येणार आहे. तसेच अलका चित्रपटगृह चौक, टिळक चौक, न.चि. केळकर मार्ग जवळील परिसर डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडण्यात येणार आहे, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गिकेमध्ये डेक्कन व संभाजी उद्यान ही दोन महत्वाची मेट्रो स्थानके आहेत. पुणे मेट्रोचे संभाजीनगर मेट्रो स्थानक संभाजी उद्यानाच्या नदीपात्राच्या बाजूला बांधण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, आपटे रोड या अंत्यत गजबजीच्या भागाला हे मेट्रो स्थानक जोडण्यात येणार आहे. संभाजी उद्यान मेट्रो स्थानक शहराच्या जुन्या पेठ भागाला जोडण्यासाठी नदीवर पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. जेणेकरून ओंकारेश्वर मंदिर चौक, वर्तक उद्यान व शनिवार पेठ या जुन्या पेठ वस्तीच्या भागांना जोडण्यात येणार आहे.

दोन्ही पादचारी पूल केबल स्टेड ब्रिज या तंत्रज्ञानावर आधारित असून नदीपात्रात एकही खांब उभारावा लागणार नाही. यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही. पुणे शहराचा सांस्कृतिक वारसा असलेले बालगंधर्व रंगमंदिर यांच्यापासून प्रेरणा घेऊन या पुलाचे बांधकाम वीणा वाद्यसदृश्य आकाराचे करण्यात येणार आहे. मेट्रोची सुविधा जास्तीत जास्त लोकांना पुरवण्यासाठी महामेट्रो बांधील असून या अनुषंगाने या दोन्ही पादचारी पुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहराचा अंत्यत महत्वाचा जुना आणि पेठांचा भाग मेट्रो स्टेशनांशी जोडण्यात येईल.

त्याचबरोबर डेक्कन व संभाजी उद्यान मेट्रो स्थानके एकमेकांना पादचारी रस्त्याद्वारे (पूल) जोडले जाणार आहेत. हा रस्ता मेट्रोच्या मुख्य उन्नत मार्गिकेच्या खाली उभारण्यात येणार आहे. एकाप्रकारे द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. सर्वात वरील स्तरावरून मेट्रोची मार्गिका असेल व खालील स्तर हा पादचाऱ्यांना वापरासाठी असेल. यामुळे नदी परिसराचे मेट्रोचे विहंगमदृश्य बघता येइल. जेष्ठ नागरिक, पर्यटक, विद्यार्थी इत्यादींना विरुंगुळ्यासाठी एक चांगली जागा उपलब्ध होईल. या मेट्रो मार्गिकेखालील लांबच लांब पूल थेट डेक्कन मेट्रो स्थानक ते संभाजी उद्यान स्थानक इतक्या लांबीचा असेल व त्याचा वापर करण्यासाठी कुठलेही तिकीट घ्यावे लागणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.