Sambhaji Raje Chhatrapati : राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही… संभाजी राजे छत्रपती नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या सविस्तर

एमपीसी न्यूज – राज्यसभा निवडणुकीला उभं राहण्यापासून ते स्वतंत्र पक्षस्थापना, महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय पाठींब्याची मागणी, शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर अशा सगळ्याच वादळी मुद्यांवरून संभाजी राजे छत्रपती सध्या चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान या सगळ्याच उलट सूलट चर्चांना अखेर विराम देत संभाजीराजे यांनी आपण राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नसल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपतींना आम्हाला बाजूला ठेवायचे नाही, बरोबर ठेवायचे आहे त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला, परंतु शिवसेनेेने माझ्यासमोर पक्षप्रवेशाची अट कायम ठेवली. राज्यसभा निवडणूक लढवणार असे मी बोललो, मागील 15 ते 20 वर्षे मी काम करतो आहे त्यामुळे पुढचा प्रवास किती खडतर आहे हे मला माहित होते. त्यामुळेच माझी अशी इच्छा होती की सर्व पक्षांनी मिळून मला राज्यसभेत पाठवावं.

पुढे संभाजीराजे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो शिवाजी महाराजांचे स्मारक असेल तिथे आपण दोघांनी जायचं आणि संभाजीराजे खोटं बोलताहेत का हे सांगायचं असे म्हणत या साऱ्या संभाषण आणि पक्षांतर्गत राजकारणावर टीका करत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना आवाहन केले.

दरम्यान, या साऱ्याच गोष्टींवर भाष्य करत असताना त्यांनी आपली भुमिका आता स्पष्ट असल्याचे सांगून आपण राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे यावेळी म्हणाले.

संभाजीराजे म्हणाले, येणाऱ्या काळात विस्थापित मावळ्यांना एकत्र आणण्याचे काम मी करणार आहे. मी स्वराज्याच्या माध्यमातून उभा राहणार आहे. ज्या आमदारांनी सह्या केल्या त्यांच्या पाठीशी आयुष्यभर राहणार असल्याचे सुद्धा ते म्हणाले. सर्वजण मला निवडणूक लढवण्यासाठी म्हणत असले तरीही मला माहित आहे त्या ठिकाणी घोडेबाजार होणार आहे. निवडणूक लढवणार नाही ही माझी माघार नाही तर स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.