Citizen should have right to criticize: नागरिकांना टीका करण्याचा अधिकार हवा…

एमपीसी न्यूज – कालच आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात आपला 74 वा स्वातंत्र्यदिवस सगळे आदेश पाळत साजरा केला. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, जास्त गर्दी न करणे या सगळ्या नियमांचे पालन करत घरात, सोसायटीमध्ये, शाळांमध्ये, शासकीय ठिकाणी कमीत कमी उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.

करोनाचं संकट ओढवलेलं असलं तरी देशात शिस्तबद्धपणे 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. लाल किल्ल्यासह देशात ठिकठिकाणी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. त्याचबरोबर सोशल मीडियातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छांचाही वर्षाव होतोय.

74 व्या स्वातंत्र्यदिनी ‘धुरळा’चे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी देशातील लोकशाही आणि टीका करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त समीर विद्वांस यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी देशातील संस्था आणि लोकप्रतिनिधींवरील टीकेसंदर्भात भाष्य केलं आहे.

‘मतमतांतर असणार. त्यावर चर्चा व्हावीच. पण लोकांचं राज्य यावं म्हणून जर लोकांनीच लोकांसाठी एक व्यवस्था निर्माण केली. ती सांभाळायला प्रतिनिधी, संस्था निर्माण केल्या, तर मग कुठलीही व्यवस्था/संस्था/प्रतिनिधींवर टीका करण्याचाही अधिकार नागरिकांना असायला हवा! लोकशाही त्यालाच म्हणणार ना?!,’ असा सवाल विद्वांस यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईविषयीही विद्वांस यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘मुंबईने आम्हा सगळ्यांना खूप काही दिलंय, अजूनही देत्ये, आयुष्यभर देत राहील. मुंबईने जगायला/स्वप्न बघायला शिकवलं, ते पूर्ण करण्याचा मार्ग दाखवला. मुंबई जितकी सगळ्यांना आपल्यात सहज सामावून घेते, मला वाटत नाही जगातलं दुसरं कुठलही शहर हे करू शकेल. मुंबई नुसती कर्मभूमी नाही प्रेम आहे’, असं म्हणाले होते.आपल्या चित्रपटातून परखड मते मांडणा-या समीरने देशात सध्या सुरु असलेल्या राजकारणावर नेमके बोट ठेवले आहे असेच यातून जाणवत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.