Talegaon News : तळेगावकर रसिकांसाठी लवकरच सुरु होणार समीप रंगमंच

महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि सुदर्शन रंगमंचाचे मिळाणार सहाय्य - शुभांगी दामले

एमपीसी न्यूज –  “प्रायोगिक नाटकांची नांदी करण्यासाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटर कलापिनीला नक्कीच सहकार्य करेल. कलापिनीची 45 वर्षांची वाटचाल पाहत असताना, संस्थेच्या कलाकारांनी मिळवलेलं यश आणि सातत्याने कलेच्या क्षेत्रात केलेलं काम निश्चितपणे प्रशंसनीय आहे. यापुढे तळेगावला येऊन समीप रंगमंच या कलापिनीच्या भावी योजनेसाठी नक्की मदत करेन” असे मत ज्येष्ठ रंगकर्मी, सुदर्शन रंगमंचच्या सर्वेसर्वा शुभांगी दामले यांनी व्यक्त केले. येथील कलापिनीच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रारंभा निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक अनिरुद्ध खुटवड, पं. सुरेश साखवळकर, संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, सदस्य विनायक भालेराव, संजय मालकर, वंदना मालकर, शिरीष जोशी, शुभांगी देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शुभांगीताईंच्या वाढदिवसानिमित्त बालभवनच्या चिमुकल्या बालकलाकारांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. भूतकाळाचे सिंहावलोकन करताना, वर्तमानाचे भान ठेवून, भविष्याचा वेध घेणारा वर्धापन दिन सोहळा प्रारंभाचा समारंभ कलाकार, कार्यकर्ते, सदस्य, देणगीदार यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडला.

शुभांगी ताई पुढे म्हणाल्या, “माझ्या वाढदिवसानिमित्त इतका हृद्य सत्कार प्रथमच होत आहे. आत्ताच्या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन केलं तर कलेच्या क्षेत्रात ही पिढी खूप चांगलं काम करू शकेल असा विश्वास वाटतो. मी स्वत: इथे बालनाट्य बसवायला येईन. सुदर्शन आणि कलापिनी या कला क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था एकत्रित येऊन, कलेची देवाण – घेवाण करतील. मुख्य म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी सुदर्शन रंगमंच कायमच मदत करेल.”

दरम्यान, अनिरुद्ध खुटवड यांनी प्रायोगिक नाटकांविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “तळेगाव येथील युवक कलाकार उत्साही असून, भविष्यात इथे कार्यशाळा घ्यायला आवडेल.” पं. सुरेश साखवळकर यांनी कलापिनीच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “कलापिनीने संगीत नाटकांची परंपरा जपली आहे. आता युवक कलाकारांनी संगीत नाटकातील प्रवेश बसवून ही परंपरा कायम ठेवावी.”

कार्यक्रमात कलापिनीतील विशेष योगदानाबद्दल आणि शष्ट्यब्दीपूर्ती निमित्त संजय मालकर, वंदना मालकर, शिरीष जोशी, शुभांगी देशपांडे या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. त्यांना शाल, भेटवस्तू आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना शिरीष जोशी म्हणाले, “कलापिनी मध्ये जे शिकलो त्याचा रोजच्या जीवनात, व्यवसायात उपयोग झाला. कलापिनीचा कलाकार म्हणून महाराष्ट्रात सगळीकडे सन्मान मिळतो”

संजय मालकर म्हणाले, “ कलापिनीच्या विविध नाटकांच्या निमित्ताने खूप दौरे केले. यामध्ये आलेले अनुभव आजही स्मरणात आहेत. आपल्याच कुटुंबात आपलं कौतुक होणं हे निश्चितपणे प्रेरणा देणारं आहे.” दरम्यान, शुभांगी देशपांडे म्हणाल्या, “ कलापिनीत वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य या जबाबदाऱ्या सांभाळताना खूप शिकायला मिळाले. आता या भव्य वास्तूत काम करताना आनंद होत आहे. जबाबदारी देखील वाढली आहे.” वंदना मालकर यांनी सत्काराबद्द्ल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात दिनेह कुलकर्णी रचित ‘कलापिनी ही तुमची अमुची’ या गीताने झाली. विनायक लिमये, विराज सवाई, डॉ. सावनी परगी, कीर्ती घाणेकर यांनी गीत सादर केले. डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. मीनल कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. विनायक अभ्यंकर यांनी स्वागत केले. डॉ. अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले.

अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनीसंयोजन केले. हितेश शिंदे आणि हनुमंत शिंदे यांनी छायाचित्रण केले. मीनल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिक मेहता, सायली रौंधळ, विराज सवाई, अशोक बकरे, रश्मी पाढरे, दीपक जयवंत, अनुजा झेंड, तेजस्विनी गांधी, संदीप मन्वरे,आदित्य धामणकर, शार्दुल गद्रे, चेतन पंडित, रामचंद्र रानडे, किशोर कसाबी आदींनी कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.