Pimpri : गलिच्छ कारखान्यात तयार व्हायचे नामांकित चित्रपटगृहात मिळणारे समोसे

पिंपरी येथील समोसा उत्पादकाला व्यवसाय बंद करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नामांकित चित्रपटगृहांमध्ये मिळणारे समोसे अत्यंत गलिच्छ कारखान्यात तयार व्हायचे. या कारखान्यावर छापा मारत अन्न व औषध प्रशासनाने समोसे तयार करण्याचा कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. ही कारवाई खराळवाडी पिंपरी येथील ने एम के इंटरप्राईजेस येथे  करण्यात आली.

अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत नागरिकांचे हित आणि आरोग्य यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची नियमावली बनवली आहे. त्यानुसार अन्नपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांना अन्नपदार्थ तयार करताना काळजी घ्यावी लागत आहे. मात्र, खराळवाडी येथील एका समोसे तयार करणाऱ्या कारखान्यात या कायद्याचे पूर्णता उल्लंघन केले जात होते. कारखान्यात तयार होणारे समोसे कुठल्याही प्रयोगशाळेत तपासल्याशिवाय पिंपरी-चिंचवड शहरातील आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलीस, विशाल ई-स्क्वेअर यांसारख्या नामांकित चित्रपटगृहात विकले जायचे. तसेच समोसे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी आणि तेल देखील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक होते.

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी खराळवाडी येथील एम के इंटरप्राईजेस या कारखान्याला भेट दिली. त्यावेळी कारखान्यात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बनवण्यात आलेल्या नियमांचे पूर्णता उल्लंघन होत असल्याचे आढळले. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनातर्फे एम के इंटरप्राईजेस या कारखान्याला समोसा उत्पादन व विक्रीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त नारागुडे व अन्न सुरक्षा अधिकारी के एल सोनकांबळे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.